दख्खनचा राजा जोतिबादेवाच्या वाडी रत्नागिरी येथील चैत्र महिन्यातील यात्रेला शनिवारपासून प्रारंभ झाला असून, हजारोंच्या संख्येने भाविक सासनकाठय़ा नाचवत डोंगरावर दाखल होत आहेत. १४ एप्रिल हा यात्रेचा मुख्य दिवस असल्याने या दिवशी होणारी लाखोंची गर्दी डोळय़ांसमोर ठेवून प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. यात्रा व दर्शन सुलभ व्हावे यासाठी प्रशासनाच्या वतीने काही बदलही करण्यात आलेले आहेत. भाविकांसाठी दर पाच मिनिटाला एक एसटी सुटणार असल्याने दरवर्षीची गर्दी टळणार आहे. तर यंदा व्हीआयपींना मंदिरात सोडण्यात येणार नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.     
चैत्र महिन्यातील यात्रेसाठी महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश अशा विविध राज्यांतील भाविक दर्शनासाठी येत असतात. लाखोंच्या संख्येने भाविक जमत असल्याने सोहळा सुविहितरीत्या पार पडावा यासाठी प्रशासनाकडूनही तयारी केली जाते. या संदर्भात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विजय सूर्यवंशी सर्व संबंधित विभागाची बैठक आयोजित केली होती. कर्तव्य आणि सेवा बजावण्यासाठी प्रशासन सज्ज झाले असून भाविकांनीही प्रशासनास सहकार्य करून यात्रा सुरळीत पार पडावी, असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.    
मुख्य यात्रेच्या दिवशी दुचाकी वाहनांना जोतिबा डोंगरावर जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे. पायथ्याशी असलेल्या दानेवाडी फाटय़ानजीक दुचाकी वाहनांसाठी वाहनतळ उभारण्यात आले आहे. तेथून मंदिराकडे जाण्यासाठी केएमटीने भाविकांना मोफत सेवा उपलब्ध केली आहे. यात्रेदिवशी सकाळी दहा वाजल्यानंतर पुजारी वा व्हीआयपी अशा कोणालाही मंदिरात प्राधान्यक्रमाने सोडले जाणार नाही. आरोग्य विभागाच्या वतीने दवाखाना, अकरा रुग्णवाहिका सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. कोल्हापूर व सांगली आगारामार्फत सव्वातीनशे एसटी बसेसची सोय करण्यात आली आहे. मध्यवर्ती बसस्थानक, रेल्वे स्टेशन व पंचगंगा नदीघाट येथून पाच मिनिटाला एक एसटी सोडली जाणार आहे. उत्पादन शुल्क विभागाने १० किलोमीटर परिसरात बीअर शॉपी बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
वाहतूक विभागाची कसोटी
शहर वाहतूक विभागाकडे मुळातच कमी मनुष्यबळ असताना त्यांना एकाच वेळी अनेक जबाबदा-या पार पाडाव्या लागत आहेत. जोतिबा यात्रा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती तसेच शरद पवार, उद्धव ठाकरे, रामदेव बाबा यांच्या सभांचे नियोजन आदी महत्त्वाच्या जबाबदा-या निभावताना या विभागाला तारेवरची कसरत करावी लागत आहे. आव्हानात्मक काम असले तरी कामाचे योग्य नियोजन करून यात्रा व शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्याचा आपला प्रयत्न आहे, असे या विभागाचे पोलीस निरीक्षक आर. आर.पाटील यांनी सांगितले.