कर्जत : नदीच्या प्रवाहात बुडालेली ग्रामपंचायतीची मोटार काढण्यासाठी गेलेल्या चौघांपैकी एकाचा मृत्यू होण्याची घटना रातंजन येथे घडली. सुनील मारुती काळे (वय ४१) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. शनिवारी सकाळी त्यांचा मृतदेह आढळला. गावासाठी काम करताना त्यांना मृत्यू आल्याने मिरजगाव परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
गुरुवारी काळे आपल्या सहकाऱ्यांसह नदीपात्रात गेले होते. पाण्याचा प्रचंड वेग असूनही त्यांनी आपल्या कंबरेला इलेक्ट्रिक वायर बांधली आणि मोटारपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. काही वेळातच पाण्याची ओढ वाढल्याने ते बुडाले. गावकऱ्यांनी संध्याकाळपर्यंत शोध घेतला. दुसऱ्या दिवशी एनडीआरएफचे पथक दाखल झाले. मात्र पाण्याच्या प्रचंड प्रवाहामुळे शोधकार्यात अडथळे आले. अखेर आज सकाळी सुनील काळे यांचा मृतदेह नदीच्या पाण्यावर तरंगताना आढळला.
ग्रामस्थांनी मृतदेह बाहेर काढून मिरजगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदनासाठी पाठवला. गावभर शोककळा पसरली. शोधमोहिमेत पोलीस हवालदार दीपक पवार, ग्रामसेवक किरण जवणे, तलाठी हरीश हुबे, सरपंच अर्चना काळे, उपसरपंच तारामती धस, शरद सकट, विलास काळे, बजरंग बांदल, श्रीराम धस, सुदाम खोटे, गौतम माने, बाळासाहेब जगदाळे, प्रकाश काळे, जयदीप काळे, सोमनाथ काळे आदी सहभागी झाले होते.
पंचक्रोशीवर शोककळा
घटना गुरुवारी सकाळी घडली, परंतु एनडीआरएफ पथक दुसऱ्या दिवशी घटनास्थळी दाखल झाले. शासनाच्या या दिरंगाईबद्दल ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. मृत सुनील मारुती काळे हे गावासाठी प्रामाणिक, मनमिळाऊ आणि तत्पर व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जात होते. त्यांच्या जाण्याने रातंजनच नव्हे तर पंचक्रोशीतील अंत:करणे पाणावली आहेत.