अयोध्येत राम जन्मभूमीवर प्रभू रामचंद्राचे मंदीर झाले पाहिजे, यासाठी तीन दशकाहून अधिक काळ लढा सुरू आहे. राम मंदिर व्हावे, यासाठी सुरू झालेल्या आंदोलनात देशातील अनेक राज्यातील असंख्य रामभक्तांनी सहभाग घेतला. अनेकांना या आंदोलनात प्राण गमवावे लागले. तर राम मंदिर पूर्ण व्हावे यासाठी अनेकांनी विविध संकल्प केले होते. कुणी मौन व्रत घेतले, तर कुणी अनवाणी राहण्याचा निर्णय घेतला. राम भक्त म्हणून जे जे करता येईल, ते करण्याचा प्रयत्न झाला. महाराष्ट्रातही काही लोकांनी राम मंदिरासाठी काहीतरी प्रण घेतले होते. त्यापैकीच एक आहेत, कोल्हापूर जिल्ह्यातील कारसेवक निवास पाटील. पाटील यांनी राम मंदिर आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला होता. १९९२ पासून श्रीराम मंदीर होईपर्यंत पायात चप्पल न घालण्याचा निर्धार त्यांनी केला आणि निष्ठापूर्वक जपला.

निवास पाटील यांच्या या त्यागी वृत्तीबद्दल २२ जानेवारीला संकल्पपूर्तीनिमित्त त्यांचा गावात नागरी सत्कार करण्यात येणार आहे. मूळचे कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील शिये गावात राहणारे निवास पाटील यांनी १९९२ च्या अयोध्येच्या लढ्यात सक्रिय सहभाग घेतला. तेव्हापासून गावात निवास पाटील यांना रामभक्त म्हणून ओळखलं जातं. निवास पाटील हे शालेय मुलांना रिक्षातून शाळेत सोडण्याचं काम करतात. याबरोबरचं गावात अनेक सामाजिक कार्यात त्यांचा सक्रिय सहभाग असतो. शिवप्रतिष्ठानच्या माध्यमातून मोहिमा करत अयोध्येत राम मंदीर व्हावे यासाठी त्यांनी जनजागृती केली.

६ डिसेंबर १९९२ ला आयोध्येत बाबरीचा ढाचा पाडला, तेव्हा त्याठिकाणी रामजन्मभूमीवर साडे तीन फुटाचे मंदीर बांधण्यात निवास पाटील सक्रिय होते. मात्र, याठिकाणी भव्य राम मंदीर व्हावे, यासाठी अनेक कारसेवकांनी वेगवेगळे निर्धार केले. तर निवास पाटील यांनी जोपर्यंत भव्य मंदिर होत नाही, तोपर्यंत पायात चप्पल न घालता अनवाणी आयुष्य जगण्याचा निर्धार केला होता. त्यावेळी ते केवळ १९ वर्षाचे होते. त्यांच्या निर्धारामुळे अनेकांना अप्रूप वाटले होते.

राम मंदिरासाठी पायात चप्पल-बूट न घालता केलेला संकल्प पूर्ण होत असल्याने गावाच्या वतीने २२ जानेवारीला निवास पाटील यांचा नागरी सत्कार करण्यात येणार आहे. वयाच्या १९ व्या वर्षी अणवाणी राहण्याचा निर्धार केला. मात्र, अनेक वर्षांपासून विविध कार्यक्रमात आणवानी राहत असल्याने मित्र, पाहुणे सवंगडी यांनी चप्पल घालण्याची विनंती केली. मात्र, निवास पाटील यांनी इतर कारसेवकांच्या तुलनेत मी केलेला त्याग काहीचं नाही. त्यामुळे मंदीर होईपर्यंत चप्पल घालणारचं नाही, असं सांगितल. गेली ३१ वर्ष अयोध्येत राम मंदिर व्हावे, यासाठी मी पायात चप्पल घातली नाही. त्याचबरोबर अनेक कारसेवकांनीही वेगवेगळे व्रत केले. आता २२ जानेवारीला अयोध्येत श्रीरामांची प्राणप्रतिष्ठा होत आहे. हा दिवस माझ्या आयुष्यातील सुवर्णक्षण आहे. कारसेवकांचे बलिदान सार्थक झाल्याचा मनस्वी आनंद होत असल्याच्या भावना राम भक्त निवास पाटील यांनी व्यक्त केल्या.