भूमी अधिग्रहण कायद्यावरून विरोधी पक्ष आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील काही राजकीय पक्ष विरोध करीत असले तरी या कायद्यामुळे शेतक ऱ्यांचे नुकसान होणार नाही, याची काळजी या कायद्यांतर्गत घेण्यात आली आहे. हा कायदा शेतक ऱ्यांचा फायद्याचा असून त्यांचे समाधान होईल, असा विश्वास लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी व्यक्त केला.
बैतुलला एका खाजगी कार्यक्रमाला जाण्यापूर्वी नागपूरला रविभवनात काही वेळ थांबल्या असताना त्या पत्रकारांशी बोलत होत्या. भूमीअधिग्रहण कायद्याला विरोध होत असला तरी या कायद्यासंदर्भात सर्वच राजकीय पक्षांशी चर्चा करून ज्या काही त्रुटी असतील त्या दूर करण्याचा प्रयत्न केला जाणार असल्यामुळे शेतक ऱ्यांचे समाधान होईल, असा विश्वास आहे. काँग्रेसचे सरकार असताना १९९४ मध्ये हा कायदा आला होता. मात्र, त्यात आता नव्याने काही बदल करण्यात आले असून नवीन अध्यादेश आणला आहे. लोकसभेत बहुमत असताना राज्यसभेत या कायद्यासंदर्भातील प्रस्ताव कसा मंजूर होणार, असे विचारले असताना त्या म्हणाल्या, राज्यसभेतील विविध पक्षनेत्यांशी या संदर्भात चर्चा करण्यात येऊन काही तोडगा निघेल, असा विश्वास आहे.
या कायद्यामुळे शेतक ऱ्यांचे नुकसान होणार नाही, याची काळजी नव्याने बदल करताना त्याचवेळी घेण्यात आली आहे. त्यानंतरही काही त्रुटी असतील तर पुन्हा सर्वपक्षीय नेत्यांसोबत चर्चा करून त्या दूर करण्यात येतील.
राष्ट्रपतींच्या अभिभाषणाच्या वेळी जो गोंधळ करण्यात आला तो सभागृहाच्या दृष्टीने योग्य नाही, अशी खंत व्यक्त करून एखाद्या मुद्यावर चर्चा करून त्यावर तोडगा काढता येऊ शकतो. मात्र, राष्ट्रपतींच्या धन्यवाद प्रस्तावाच्या वेळी गोंधळ घालणे योग्य नसून ते सभागृहाला शोभेसे नसल्याचे मत महाजन यांनी व्यक्त केले.
कुठलाही कायदा किंवा प्रस्ताव आणला जातो तो सर्वांच्या फायद्यासाठी असतो. त्यामुळे त्यात बदल करायचे असतील ते करता येऊ शकतात. देशाच्या विकासासाठी सरकार काम करीत असल्यामुळे प्रत्येक राजकीय सहकार्याची भावना ठेवून चर्चा केली पाहिजे. केवळ विरोधाला विरोध करणे उचित नाही, असेही त्या म्हणाल्या. विदर्भातील खासदारांना सभागृहात बोलण्याची संधी दिली जात नसल्याचे विचारले असता, सभागृहात प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे आणि त्यासाठी प्रत्येक राजकीय पक्षाला संधीही दिली जाते. त्यामुळे सभागृहात हा भेदभाव नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
स्वाइन फ्लूबाबत चिंता व्यक्त करून त्या म्हणाल्या, राज्य सरकार त्यावर नियंत्रण आणण्यासाठी प्रयत्न करीत आहे. नागरिकांनी त्या संदर्भात काळजी घेतली पाहिजे. नागपूर ही विचारांची आणि दीक्षा देणारी भूमी आहे. त्यामुळे या शहराचे देशविदेशात वेगळे महत्त्व आहे.
 या शहराशी माझे वेगळे नाते आहे. लोकसभा अध्यक्ष झाल्यानंतर प्रथमच उपराजधानीत आले आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूरचे आहेत. त्यामुळे विदर्भाच्या विकासाकडे दुर्लक्ष होणार नाही, असा विश्वास आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भैय्याजी जोशी-सुमित्रा महाजनांमध्ये चर्चा?
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह भैय्याजी जोशी आणि लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन या दिल्लीवरून इंडिगो विमानाने आज सकाळी सोबतच नागपुरात आले. या प्रवासात दोन्ही उभयतांची चर्चा झाल्याची माहिती आहे. नागपुरात १२ ते १५ मार्चदरम्यान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रतिनिधींची अखिल भारतीय बैठक होणार असून त्यात अनेक फेरबदल होण्याची शक्यता आहे. त्या पाश्र्वभूमीवर चर्चेला वेगळे महत्त्व असल्याचे बोलले जात आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Land acquisition benefit to farmers says sumitra mahajan