१५ दिवसांआड पाणी; उदगीरला पाणीपुरवठा करणारे धरणही भरले

पाऊस चांगला झाला आणि लातूरकरांच्या नळाला तब्बल ४ महिने ११ दिवसांनी सोमवारी पाणी आले. भीषण पाणीटंचाई अनुभवणाऱ्या लातूरकरांना पाऊस पडल्यानंतर २४ तासांच्या आत नळाला पाणी देऊन महापालिकेने सुखद धक्का दिला. शनिवारी रात्री झालेल्या पावसामुळे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या नागझरी व साई या दोन्ही बंधाऱ्यांत रविवारी पाणी आले.

रविवारी नागझरी व साई जलाशयात पाणी आल्यानंतर महापालिकेने पाणी उचलण्यास प्रारंभ केला. सोमवारी सकाळी शासकीय वसाहतीतील जलकुंभामधून नळाद्वारे पाणीपुरवठा करण्यात आला.  आर्वी जलकुंभ येथून प्रभाग क्रमांक ११, १२ व १३ येथून काही भागांस पाणीपुरवठा करण्यात आला. मदनेनगर भागात महापौर दीपक सूळ यांनी नळाचे पूजन करून त्या भागातील नागरिकांना पाणी दिले. महापौर सूळ यांनी मांजरा नदीवरील बंधाऱ्यातील पाणी साडेसात मीटपर्यंत थांबवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिले. मांजरा नदीवरील साई व नागझरी बंधाऱ्यातील साडेचार मीटरपेक्षा अतिरिक्त पाणी नदीच्या पात्रात सोडले जाते.

साई व नागझरी बंधाऱ्याला पाणी आल्यानंतर बेलकुंड येथून टँकरद्वारे आणणारे पाणी तातडीने बंद करण्यात आले आहे. जलदूत रेल्वे जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून शहरातील पाणी वितरण व्यवस्था मार्गी लागण्याचा अंदाज आल्यानंतर बंद केली जाणार आहे. महापालिकेने नळाद्वारे पाणी देण्याचा निर्णय केला असला तरी १५ दिवसांतून एकदा पहिल्या टप्प्यात हे पाणी दिले जाणार आहे.

जिल्हय़ात वार्षकि सरासरीच्या ५८.३२ टक्के पाऊस

गेल्या दहा दिवसांपासून दररोज पावसाची हजेरी असून रविवार, ३१ जुल रोजीही जिल्हय़ातील दहाही तालुक्यांत पावसाने हजेरी लावली. जुलअखेर जिल्हय़ात एकूण सरासरीच्या ५८.३२ टक्के इतका पाऊस झाला आहे. सोमवारी सकाळी ८ वाजता संपलेल्या २४ तासांत तालुकानिहाय पडलेल्या पावसाची आकडेवारी मि.मी.मध्ये पुढीलप्रमाणे- कंसातील आकडे आतापर्यंतच्या एकूण पावसाचे आहेत. लातूर १०.३८ (३८६.४०), औसा १७.४२ (३८०.५१), रेणापूर ३.५० (५१९), उदगीर १२ (४५८.४०), अहमदपूर १७ (४६८.४८), चाकूर ६.८० (५९७.८०), जळकोट १९ (४५२), निलंगा १९.७५ (४९१.८१), देवणी ८ (४०३.६५), शिरूर अनंतपाळ ६.३३ (५१९.६४), सरासरी १२.०२ (४६७.७७).

बनशेळकी भरले काठोकाठ

उदगीर शहराला पाणीपुरवठा करणारे बनशेळकी धरण काठोकाठ भरून वाहू लागले आहे. गतवर्षी महिनाभरातून एकदा पाणी उदगीरकरांना मिळत होते. या वर्षी वरुणराजाने कृपा केल्यामुळे धरण भरले आहे.

अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान

जिल्हय़ातील ११ मंडळांत अतिवृष्टी झाल्यामुळे सोयाबीन, तूर, मूग आदी पिकांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. पावसाबरोबर वाऱ्याचा वेगही असल्यामुळे ज्वारीचे उभे पीक आडवे झाले. अनेकांच्या शेतातील पीकच वाहून गेले. रेणापूर मंडळात तब्बल १८० मि.मी. पाऊस झाल्यामुळे त्या परिसरात पिकांचे मोठे नुकसान झाले. निलंगा तालुक्यातील मदनसुरी, पानचिंचोली, उदगीर तालुक्यातील हेर, चाकूर तालुक्यातील चाकूर, नळेगाव, वडवळ आदी मंडळांत शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले.