औरंगाबाद शहरात मंगळवारी सकाळी एक बिबट्या दिसून आल्याने खळबळ उडाली होती. या बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांकडून प्रयत्न केले जात होते. मात्र, तो हाती लागत नसल्याने कर्मचाऱ्यांच्या नाकीनऊ आले होते. अखेर सहा तासांच्या प्रयत्नांनतर त्याला जेरबंद करण्यात वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना यश आले आहे. दरम्यान, भरवस्तीत बिबट्या दिसल्याने लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.

सकाळी साडेसहा वाजता सिडकोतील एन १ भागात असलेल्या काळा गणपती मंदिरामागील वॉकिंग ट्रॅक भागात स्थानिकांना बिबट्या दिसला त्यानंतर काही स्थानिक लोकांनी त्याला आपल्या मोबाईलच्या कॅमेरॅत टिपले. त्यानंतर वनविभागाला याची माहिती देण्यात आली. वनविभागाचे कर्मचारी आणि पोलीस घटनास्थळी पोहोचले व त्यांनी या बिबट्याचा शोध सुरु केला. हा बिबट्या एका घरातच लपून बसल्याचे वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी हेरले होते. त्यानुसार त्यांनी आपल्या हालचाली सुरु केल्या, मात्र तो नक्की कुठे आहे हे त्यांनी गुप्त ठेवले. माध्यमांनाही याची माहिती त्यांनी कळू दिली नाही.

दरम्यान, ज्या घराजवळ हा बिबट्या दिसून आला होता त्या घराच्या एका खोलीला वनविभागाच्या कर्मचानी चहुबाजूने जाळी लावली होती, याच खोलीत तो होता. त्यानंतर योग्य वेळ साधत बिबट्याला गुंगीचे इंजेक्शन टोचण्यात आले आणि बेशुद्ध झाल्यानंतर त्याला जेरबंद केले. त्यानंतर एका पिंजऱ्यातून वनविभागाचे कर्मचारी त्याला घेऊन गेले.