सातारा : सातारा जिल्ह्यात पाऱ्याने चाळिशीचा पल्ला ओलांडला आहे. घामाच्या धारांनी सातारकर हैराण आहेत. साताऱ्यात रविवारी ३९.९, माण, खटाव ४१, तर महाबळेश्वर येथे ३२.७, वाई ३६ अंश सेल्सिअस तापमान नोंदविले गेले. यामुळे शहरातील प्रमुख बाजारपेठांत शुकशुकाट जाणवत असून, दुपारच्या वेळी रस्ते ओस पडलेले आहेत. दुष्काळाचे चटके सोसणाऱ्या साताऱ्यात उष्णतेची लाट आली आहे.

मागील तीन दिवसांपासून बहुतांश भागातील पारा ४० अंशांवर आहे. सातारा शहराच्या पाऱ्याची ४०.७ अंशांवर नोंद झाली. एप्रिल महिना सुरू झाल्यापासून जिल्ह्यातील पारा वाढत गेला आहे. शहराबरोबरच ग्रामीण भागातही झळा तीव्र झाल्या आहेत. सकाळी नऊ वाजल्यापासून उन्हाचे चटके जाणवू लागले आहेत. हवामानातील बदल आणि उन्हाची तीव्रता यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होऊ लागला आहे. सकाळी आणि संध्याकाळच्या वेळीच नागरिक कामासाठी बाहेर पडत आहेत. सकाळी अकरानंतर बाजारपेठ आणि रस्त्यावर शुकशुकाट जाणवत आहे. पुणे-बंगळूर महामार्गावरही दुपारच्या वेळी वाहतूक फारच मंदावत आहे. सेवा रस्त्यावर झाडांचा आडोसा पाहून मालवाहतूक करणारे जड वाहन चालक विश्रांती घेत आहेत.

मागील काही दिवसांपासून जिल्ह्यातील उष्णतेत मोठी वाढ झाली आहे. उन्हाळ्यात पारा वाढल्याने शरीराचे तापमान नियंत्रित करण्यासाठी थंड पेय आणि उन्हाळी फळांना मोठी मागणी आहे. थंड हवेसाठी पंखा, कूलर, एसीचाही मोठा वापर होत आहे. त्यामुळे जिल्ह्यात वीजवापर वाढला आहे.

वाढत्या उन्हामुळे गावोगावच्या पाणीपुरवठ्यावरही मोठा परिणाम झाला असून, अनेक ठिकाणी पाणीकपात केली जात आहे.दुष्काळी भागाचे तालुके असणाऱ्या खंडाळा, फलटण, माण खटाव, कोरेगाव आदी भागांत मोठी पाणीटंचाई आहे. शेतीतील पिके आणि पशुधन जगवण्याचे मोठे आव्हान शेतकऱ्यांसमोर आहे. आरोग्य विभागाने जिल्हा रुग्णालयात उष्माघात विभाग सुरू केला आहे. नागरिकांनी शक्यतो उन्हात जाणे टाळावे, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

जिल्ह्यात सर्वत्र तापमानात वाढ झालेली असतानाही महाबळेश्वर येथे मागील काही दिवसांपासून कमाल तापमान ३२ ते ३२.७, किमान तापमान २०.५ अंश आढळून येत आहे. रात्रीपासून पहाटेपर्यंत १२ ते १७ अंश तापमान राहत आहे. त्यामुळे पर्यटक, स्थानिक दिवसा तीव्र उन्हाळा आणि रात्री थंडी, धुके अनुभवत आहेत.