उन्हाळा सुरू होण्यापूर्वीच राज्यात अवकाळी पावसाचे आवर्तन सुरू झाल्यामुळे मान्सूनचे आगमन पुढे जाण्याचा अंदाज अनेक जण व्यक्त करीत आहेत, मात्र या चच्रेने घाबरून जाण्याचे कारण नाही. विविध विभागांच्या हवामानतज्ज्ञांनी या वर्षी ९५ टक्के पावसाचा अंदाज व्यक्त केला. अर्थात, ५ टक्के पाऊस कमी पडणार म्हणजे फार चिंता करण्याचे कारण नाही. मुळात हा अंदाज लवकर व्यक्त केला गेल्यामुळे यात बदल होण्याचा संभवही अधिक आहे, असे सेवानिवृत्त कृषी आयुक्त डॉ. कृष्णा लव्हेकर यांनी सांगितले. यंदा मान्सून लांबल्यास पिकांच्या उत्पादनाबरोबरच जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्नही गंभीर होण्याची भीती त्यांनी व्यक्त केली.
मुळात पडणारा पाऊस नेमका कसा पडेल? कधी पडेल? पावसाचा किती काळाचा खंड असेल? याबद्दलचा अंदाज अजून कोणी व्यक्त केला नाही. त्यामुळे या अंदाजाबाबत चिंता करण्यात अर्थ नाही. शेतकरी मंडळी पाऊस कसा पडतो, त्यानुसार पिकांची रचना करीत असतात. जूनच्या पहिल्या आठवडय़ात पाऊस पडल्यास खरिपाची मूग, उडीद ही पिके घेतली जातात. पाऊस लांबल्यास सोयाबीनवर भर दिला जातो. त्यापेक्षाही अधिक काळ म्हणजे जुलैच्या दुसऱ्या आठवडय़ात मान्सूनचे आगमन झाले, तर तूर, बाजरी, ज्वारी, तीळ अशी पिके घेण्याकडे कल असतो.
खरिपाचे कोणते पीक घ्यायचे, यापेक्षा घेतलेल्या पिकाची उत्पादकता कशी असेल? पेरणीनंतर मिळणारे उत्पन्न शेतकऱ्याला परवडणारे राहील का, याची चिंता शेतकऱ्यांना असते. कृषी विद्यापीठांनी या दृष्टीने वेळेत मार्गदर्शन केले पाहिजे. पाण्याचा ताण सहन करणारे नवीन वाण संशोधित झाले असल्यास त्याची माहिती शेतकऱ्यांना दिली गेली पाहिजे. कृषी संशोधनाचा थेट लाभ शेतकऱ्यांना व्हायला हवा. शेतकरी व शेतीशास्त्रज्ञ यांचा संवाद घडल्यास उत्पादनवाढीचा लाभ होईल.
सिंचनाच्या बाबतीत शेतकरी अधिक जागरूक व्हायला हवा. शेतीचे क्षेत्रफळ सिंचनाच्या उपयोगात आणण्यास शेतकऱ्याने लक्ष केंद्रित केले पाहिजे. आपल्या आर्थिक क्षमतेनुसार पावसाचे पाणी शेतीत मुरवले पाहिजे. शेततळय़ाप्रमाणे पाणी साठवण्याची यंत्रणा तयार करून साठवलेल्या पाण्याचा उपयोग पिकांसाठी करायला हवा. हवामानातील बदल कोरडवाहू शेतकऱ्यांना अतिशय त्रासदायक राहणार आहेत, याची जाणीव प्रत्येकाने ठेवायला हवी.
मान्सूनचे आगमन लांबणार असल्याचा अंदाज विविध तज्ज्ञ व्यक्त करतात. मान्सून लांबल्यास पिकांच्या उत्पादनाबरोबरच जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर होऊ शकतो. कडबा हे मुख्य पशुखाद्य आहे. त्याला पर्यायी खाद्य कोणते निर्माण करता येईल, याकडे शेतीतज्ज्ञांनी लक्ष देण्याची गरज आहे. शेतीबरोबरच दुधाचा व्यवसाय मोठय़ा प्रमाणात जोपासला जातो. दुधाचे उत्पादन घटल्यास शेतकरी कोलमडून पडेल, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली.
संग्रहित लेख, दिनांक 10th May 2014 रोजी प्रकाशित
‘हवामानाच्या अंदाजात बदलाचा संभव अधिक’
उन्हाळा सुरू होण्यापूर्वीच राज्यात अवकाळी पावसाचे आवर्तन सुरू झाल्यामुळे मान्सूनचे आगमन पुढे जाण्याचा अंदाज अनेक जण व्यक्त करीत आहेत, मात्र या चच्रेने घाबरून जाण्याचे कारण नाही.

First published on: 10-05-2014 at 01:30 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Likelihood to change of weather reckoning