अकोला जिल्ह्यातील बाबुजी देवस्थानाजवळ झाड पत्र्यावर कोसळून सात जणांचा मृत्यू झाला. हे सर्व लोक बाहेर गावाहून या ठिकाणी आले होते. या घटनेवर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष अविनाश पाटील यांनी निवेदन जारी करत भूमिका मांडली आहे. यात त्यांनी हे सर्व लोक बाबुजी देवस्थान येथे भूतबाधा उतरवण्याच्या अंधश्रद्ध मानसिकतेतून आल्याचा गंभीर आरोप केला आहे. तसेच कल्याणकारी सरकार नागरिकांचे प्रश्न सोडवण्यात अपयशी पडल्याने ते बुवाबाजीच्या आहारी जातात, असं मत व्यक्त केलं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अविनाश पाटील म्हणाले, “भूतबाधा झाली म्हणून ती उतरविण्यासाठी आणि बुवाबाजीच्या उपचारासाठी दर रविवारी अकोला जिल्ह्यातील पारस येथील बाबुजी देवस्थानात बाहेरगावहून मोठ्या प्रमाणात लोक येतात. रविवारी (९ एप्रिल) अकोला जिल्ह्यात झालेल्या वादळी वाऱ्यासह पाऊसामुळे पारस येथील बाबुजी देवस्थानाजवळील झाड पत्र्याच्या शेडवर पडले आणि त्याखाली दबून सात लोकांचा जागीच मृत्यू झाला आहे. मृत्यूमुखी पडलेले सर्वच लोक बाहेरगावाहून आलेले होते.”

“सरकार अपयशी ठरल्याने नागरिक बाबुजी देवस्थानातील बुवाबाजीच्या आहारी”

“आपल्या जगण्याच्या दैनंदिन प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी जेव्हा संवैधानिक जबाबदारी असणारे कल्याणकारी सरकार अपयशी ठरते, तेव्हा सर्वसामान्य जनता अंधश्रद्ध मानसिकतेतून बुवाबाजीच्या आहारी जाते. अशा अगतिक होऊन जगणाऱ्या लोकांच्या असहायतेचा फायदा घेऊन श्रद्धा, धार्मिकता, अध्यात्मिकतेच्या नावाखाली भक्तांची दिशाभूल केली जाते. दैवी शक्ती, अवतार, चमत्कारिक उपचारांचा दावा करून मानसिक गुलामी लादली जाते. अशा असहाय्य लोकांची संघटीत होऊन फसवणूक करून आपले आर्थिक आणि सामाजिक, राजकीय हितसंबंध जपण्यासाठी कार्यरत असलेल्या लोकांना ओळखले पाहिजे”, असं आवाहन अविनाश पाटील यांनी केलं.

“बाबुजी देवस्थानात अंधश्रद्ध मानसिकतेतून जमलेल्या समुहावर नैसर्गिक आघात”

अविनाश पाटील पुढे म्हणाले, “देवस्थानांच्या नावाने या ठिकाणांवर लोकांची गर्दी जमा करण्यासाठी, प्रसिद्धीसाठी, दान-देणगी विक्रीतून संपत्ती मिळविण्यासाठी वेगवेगळ्या क्लुप्त्या केल्या जात आहेत. लोकांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळे चमत्कारांचे दावे केले जात आहेत. त्यातून जमणाऱ्या गर्दीमुळे सर्वच व्यवस्था कोलमडतात. त्यातून बऱ्याचदा मानवनिर्मित आणि काही वेळा नैसर्गिक आपत्ती घडून येतात.”

“सरकारने असे प्रकार होऊ नयेत याची जबाबदारी घ्यावी”

“प्रदिप शर्मा यांनी मध्य प्रदेशात केलेल्या रुद्राक्ष सत्संगामुळेही अनेकांचा मृत्यू ओढवला होता आणि हजारोंना अराजकाला सामोरे जावे लागले होते. तेच पुन्हा पुन्हा घडून येत आहे. याची सरकारने नोंद घेऊन असे प्रकार होऊ नयेत याची जबाबदारी घेतली पाहिजे,” असे आवाहन अविनाश पाटील यांनी केले.

हेही वाचा : अकोला: भक्तीत तल्लीन भाविकांवर काळ बनून वादळ कोसळले; सभामंडपावर वृक्ष पडून सात जणांचा मृत्यू, २६ जखमी

दरम्यान, अकोला जिल्ह्यातील पारस येथे बाबुजी महाराज संस्थानात सभामंडपावर झाड कोसळून झालेल्या दुर्घटनेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त केला आहे. मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी चार लाख रुपये मदत त्यांनी जाहीर केली आहे. तसेच सर्व जखमींवर शासकीय खर्चाने व्यवस्थित उपचार करण्यात यावेत, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. या दुर्घटनेत ७ भाविकांचा मृत्यू झाला, तर २३ जण जखमी झाले आहेत.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra anis avinash patil allege superstitions in akola accident pbs