
एकनाथ संभाजी शिंदे (Eknath Shinde) हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. त्यांनी जून २०२२ मध्ये शिवसेनेविरोधात बंड करुन भाजपासोबत सरकार स्थापन केलं. ते २०१९ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेचे सदस्य म्हणून कोपरी-पाचपाखाडी, ठाणे, येथून निवडून आले. एकनाथ शिंदे हे शिवसेनेमध्ये बंडखोरी करुन मुख्यमंत्रीपदापर्यंत पोहचलेले पहिले नेते आहेत. आपण बंड केलेला नसून उठाव केलेला आहे आणि आपण आजही बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांवर चालणारे कट्टर शिवसैनिक असून सध्या स्थापन केलेले सरकार शिवसेना भाजपाचेच आहे अशी भूमिका शिंदे यांनी मांडली आहे.
ते शिवसेनेचे (Shivsena) सदस्य म्हणून कोपरी-पाचपाखाडी, ठाणे, येथून विधानसभेचे सदस्य आहेत. एकनाथ शिंदे हे ठाणे महापालिकेत दोन टर्म नगरसेवक होते आणि तीन वर्षे स्थायी समितीचे सदस्य आणि चार वर्षे सभागृह नेते होते.
त्यांचा जन्म ९ फेब्रुवारी १९६४ रोजी महाराष्ट्रात झाला. त्यांचे मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण मंगला हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालय, ठाणे येथून झाले. नंतर त्यांनी ५६व्या वर्षी बीएची डिग्री प्राप्त केली. त्यांनी श्रीमती लता एकनाथ शिंदे यांच्याशी विवाह केला. त्यांच्या मुलाचे नाव श्रीकांत शिंदे आहे. ते ऑर्थोपेडिक सर्जन असून ते कल्याण मतदारसंघातून लोकसभेचे सदस्य म्हणून निवडून आले होते.