Maharashtra Class 11 Admission Delayed : यंदा मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात सुरू झालेली अकरावी प्रवेश प्रक्रिया अद्यापही संपली नसून सध्या अकरावी फेरी सुरू आहे आणि या फेरीतही राज्यातील जवळपास ५ हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. अकरावीच्या वर्गांसाठी २२० दिवस अध्यापन होणे अपेक्षित असताना प्रत्यक्षात दोन ते तीन महिने म्हणजे ६०ते ९० दिवसच सगळ्या विद्यार्थ्यांसाठी अध्यापनाचे असतील.

यंदा दहावीचा निकाल लवकर जाहीर झाल्यामुळे अकरावीची प्रवेश प्रक्रियाही मे अखेरीस सुरू झाली. तेव्हापासून अद्यापपर्यंत प्रवेश प्रक्रिया सुरूच आहे. महाविद्यालयातील पन्नास टक्के प्रवेश झाल्यानंतर महाविद्यालय सुरू करण्याची मुभा शिक्षण विभागाने दिली आहे. त्यानुसार ११ ऑगस्टपासून राज्यातील अकरावीचे वर्ग सुरू झाल्याचा दावा शिक्षण विभागाने केला. प्रत्यक्षात मात्र ११ ऑगस्टला ६ लाख १८ हजार विद्यार्थी प्रवेशाच्या प्रतिक्षेत होते. आकडेवारीनुसार ८ लाख १३ हजार विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला असला तरीही राज्यातील ९ हजार ५२२महाविद्यालयांपैकी सगळ्यांना पन्नास टक्के विद्यार्थी मिळाले नाहीत. नामांकित महाविद्यालयेच प्रवेशाचे गणित जुळवू शकली. अनेक महाविद्यालयांना पुढील फेरीची म्हणजे ऑगस्ट अखेरपर्यंत वाट पहावी लागली. त्यानंतर गणेशोत्सव, नवरात्र उत्सवाच्या सुट्ट्यांचा हिशोब होतो तोवर पहिले सत्र संपण्याची वेळ आली आहे. राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अकरावीच्या सत्र परीक्षा सुरू झाल्या आहेत तर काहींचे पहिल्या सत्र अंतिम टप्प्यात आहे. मात्र, तरीही अकरावीची प्रवेश प्रक्रिया पूर्ण झालेली नाही.

दिवाळीनंतर म्हणजे नोव्हेंबरमध्ये दुसरे सत्र सुरू होणार आहे. महाविद्यालयांचे महोत्सव, स्नेहसंमेलन, उपक्रम आणि त्यानंतर दहावी, बारावीच्या परीक्षांचे नियोजन यातून उरणाऱ्या वेळात अकरावीच्या वर्गांमध्ये प्रत्यक्ष अध्यापन होईल, असे कनिष्ठ महाविद्यालयांतील शिक्षकांनी सांगितले.

सळसळत्या उर्जेचे साचलेपण

यंदा दहावीची परीक्षा १७ मार्च रोजी संपली. तेव्हापासून पाच ते सहा महिने अपवाद वगळता लाखो विद्यार्थी कोणत्याही औपचारिक शिक्षण प्रवाहात नाहीत. कुमारवयीन, १५ -१६ वर्षांची मुले आणि त्यांचे पालक अनेक महिनेपुढील प्रवेश आणि प्रश्न बाळगून बसून आहेत. दहावीपर्यंतच्या शाळेतील नियंत्रित वातावरणातून अकरावीला विद्यार्थी महाविद्यालयात येतात. तेव्हा मोकळ्या वातावरणाचा परिणाम त्यांच्या एकूण अध्ययनावर होत असतो. अनेक विषयांची पहिल्यांदाच ओळख होते. विशेषत वाणिज्य शाखेतील अनेक विषयांची शालेय अभ्यासक्रमांत अजिबातच ओळख झालेली नसते. काहीवेळा विद्यार्थ्यांचे माध्यम बदलते. त्यामुळे अकरावीच्या वर्षातील अध्ययन, अध्यापन गांभिर्याने होणे आवश्यक आहे. ज्या बारावीच्या वर्षाला महत्व दिले जाते. त्याचा पाया अकरावीला तयार होत असतो. मात्र पुरेसा वेळमिळत नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होते.

शाळा महाविद्यालयांच्या प्रयोगशाळा

नवे वर्ष नवे प्रयोग, नवे मंत्री, नवे प्रयोग असेच शिक्षण विभागाचे धोरण गेली अनेक वर्षे दिसते आहे. एखाद्या प्रयोगाची आवश्यकता आहे का, स्थानिक परिस्थिती काय, तेथील गरजा काय याचा प्राथमिक पातळीवरही विचार केला जात नसल्याने दरवर्षीनव्या गोंधळांचा विद्यार्थी आणि पालकांना फटका बसतो. गेल्या काही वर्षांपासून मोठ्या शहरांमध्ये, प्रवेशासाठी आत्यंतिक चढाओढ असलेल्या भागांतील प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने करण्यात येत होती. बाकी राज्यभर केंद्रीय पद्धतीने मात्र ऑफलाईन प्रवेश होत होते. यंदा मात्र राज्यभरातील प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने करण्याचा घाट शिक्षण विभागाने घातला. तो घालताना पायाभूत सुविधा किती याचा विचारही फारसा झाल्याचे दिसत नाही. त्यामुळे प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्याच टप्प्यांत विभागाला ठेच खावी लागली. सातत्याने येणाऱ्या तांत्रिक अडचणींमुळे प्रवेश प्रक्रिया रखडली.

इंटिग्रेटेडचे तण

विज्ञान शाखेला प्रवेश घेऊन पुढे प्रवेश परीक्षा आणि व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश हा सध्या शिक्षणातून चांगल्या मोबदल्याच्या रोजगाराकडे नेणारा राजमार्ग मानला जातो. परिणामी बहुतांशी विद्यार्थ्यांचा आणि पालकांचा ओढा या प्रवाहाकडेआहे. त्यात सर्वाधिक महत्व त्यातील प्रवेश परीक्षांना असते. त्यामुळे त्याची तयारी लवकर सुरू करण्याकडे कल असतो. त्यातून एकात्मिक महाविद्यालयांचे (इंटिग्रेटेड) तण राज्यात वाढले आहे. म्हणजे. प्रत्यक्षात शिक्षण प्रवेश परीक्षांची तयारी करून घेणाऱ्या शिकवण्यांमध्ये आणि परीक्षेपुरते मान्यताप्राप्त महाविद्यालयांत नाव अशी याची रचना.

अकरावीच्या महाविद्यालयांतील नियमित प्रवेश प्रक्रिया रखडत असल्यामुळे या एकात्मिक महाविद्यालये राज्यभर झपाट्याने फोफावली आहेत. प्रवेश कधी होणार, तोपर्यंत काय करायचे, अकरावीचा अभ्यास पूर्ण करून बारावी आणि प्रवेश परीक्षांची तयारी कधी करायची अशा रास्त पण अनुत्तरीत प्रश्नांमधून पालकांचा एकात्मिक महाविद्यालयांमध्ये पाल्यांना प्रवेश घेण्याकडे ओढा वाढला आहे.

रिक्त जागा भरण्याचे प्रयोग

राज्यात यंदा अकरावीच्या २१ लाख ४३ हजार ६१० जागा उपलब्ध आहेत. राज्यात दहावीची परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांची दरवर्षीची सरासरी संख्या १५ ते १६ लाख आहे. म्हणजेच विद्यार्थ्यांच्या संख्येपेक्षा पाच ते सहालाख जागा जास्त आहेत. दहावी उत्तीर्ण सर्वच विद्यार्थी अकरावीला प्रवेश घेत नाहीत. अकरावी व्यतिरिक्त इतर अनेक शिक्षण प्रवाहांकडे लाखभर विद्यार्थी वळतात, काही शिक्षणाच्या प्रवाहातून बाहेर पडतात. मात्र मागेल त्याला नवी तुकडी आणि मागेल त्याला नवे महाविद्यालय अशा अघोषित धोरणामुळे अकरावीच्या वर्गांची आणि तुकड्यांची संख्या झपाट्याने वाढली आहे. परिणामी रिक्त जागांचा प्रश्न महाविद्यालयांसमोर आ वासून उभा आहे. काही महाविद्यालयांसाठी ती अस्तित्वाची लढाई ठरली आहे. अकरावीचे वर्ष अभ्यासातूनच वजा !