राष्ट्रवादीचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या सोलापूर जिल्ह्य़ात पक्षांतर्गत गटबाजीला ऊत आल्याने पक्ष विस्कळीत झाल्याच्या पाश्र्वभूमीवर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या ताब्यातील सत्ता हिसकावून घेण्याचे भाजपचे मनसुबे अयशस्वी झाले. काँग्रेस व शेकापच्या मदतीने सत्ता राखण्यात राष्ट्रवादी यशस्वी होत असली तरी आगामी काळात पक्ष एकसंध व एकसूत्रात बांधला गेला नाही तर हा पक्ष सोलापुरातून हद्दपार झाल्याशिवाय राहणार नाही, असा धोक्याचा इशाराच जिल्हा परिषदेच्या निवडणूक निकालाने दिला आहे.

एकेकाळी काँग्रेसचे एकहाती वर्चस्व असलेल्या जिल्हा परिषदेत ४० वर्षे अकलुजच्या मोहिते-पाटील घराण्याचा प्रभाव होता. या ठिकाणी सुरुवातीला सहकारमहर्षी शंकरराव मोहिते-पाटील व नंतर त्यांचे सुपुत्र खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांची हुकमत चाले. परंतु अलीकडे आठ-नऊ वर्षांच्या काळात राजकीय समीकरणे बदलत गेली. त्यातूनच ‘तरुण तुर्का’ना महत्त्व दिले गेल्यानंतर राष्ट्रवादीतील एकसंधपणा नष्ट होऊन पक्षात गोंधळ सुरू झाला. राष्ट्रवादीत तशी सुभेदारीची परंपरा चालतच आली आहे. या सुभेदारीने पक्षाला कडेलोटाच्या दिशेने आणून ठेवले. त्यावर आळा घालण्याऐवजी उलट, या कारवाया आणखी कशा वाढतील, याचेच राजकारण झाले. परिणामी, या बेदिलीच्या वातावरणात महत्त्वाकांक्षा वाढलेल्या तरुण तुर्कानी नंतर वेगळीच वाट चोखाळत पक्षालाच आव्हान दिले.

या पाश्र्वभूमीवर अलीकडे जिल्ह्य़ात पक्षाची वाताहत होत असताना सरतेशेवटी पक्षाचे नेते अजित पवार यांनी स्थिती सावरण्याचा प्रयत्न केला खरा, परंतु प्रश्न विश्वासाचा होता. त्यामुळे पक्षाची स्थिती हाताबाहेर जात असतानाच नगरपालिका निवडणुका लागल्या. त्यात पक्षाला मोठी मानहानी पत्करावी लागली.  त्यानंतर जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकीत राष्ट्रवादीची संपूर्ण नाळ तुटू न दिलेल्या तरुण तुर्कानी राष्ट्रवादी‘बाहेर’ राहून राजकारण करीत भाजपला ताकद देण्याचा प्रयत्न केला. मागील विधान परिषद निवडणुकीत या तरुण तुर्कांनी आपले कर्तृत्व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर सिद्ध केले होते. त्यामुळे ही मंडळी जिल्हा परिषदेची सत्ता हिसकावून घेण्यासाठी निश्चितच उपयोगी पडतील, असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांना वाटणे साहजिकच होते. त्यासाठी त्यांनी राष्ट्रवादीच्या विरोधात सर्वानाच भाजपमध्ये प्रवेश घेऊन कमळ चिन्हावर निवडणुका लढविण्याची अट घातली. त्यानुसार काही मोहरे हाती लागलेदेखील. परंतु एकटय़ा भाजपच्या चिन्हावर निवडणुका लढविल्यास एकहाती सत्ता काबीज होणे अशक्य असल्याने भाजपपुरस्कृत महाआघाडीचा मार्ग खुला झाला. तर इकडे राष्ट्रवादीपुढे उरल्यासुरल्या अस्तित्वाचा प्रश्न होता. पक्षाच्या ‘बाहेर’च्या मंडळींच्या उपद्रव शक्तीचा चांगलाच अनुभव असल्यामुळे पक्षाच्या ‘आतल्या’ मंडळींची जणू कसोटी होती. यातच पक्षाचे नेते अजित पवार यांनी सोलापूरकडे पाठ दाखविल्याने ‘संशयकल्लोळ’ अधिकच वाढला. नेमक्या याच गोंधळाचा फायदा घेण्याचा घाट माढय़ाचे संजय शिंदे, पंढरपूरचे विधान परिषद सदस्य प्रशांत परिचारक, बार्शीचे राजेंद्र राऊत, माळशिरसचे उत्तम जानकर यांनी घातला. त्यांना ताकद देण्यासाठी स्वत: मुख्यमंत्री फडणवीस यांना बार्शी व वेळापुरात दोन सभा घ्याव्या लागल्या. अर्थातच, योग्य ‘रसद’ही दिली गेली.

याउलट राष्ट्रवादीत कोठेही आक्रमकता न दिसता ज्या त्या तालुक्यात सुभेदारांनी आपापल्या परीने सा़वध पावले टाकली. मात्र पक्षात एकसूत्रीपणाचा अभाव असल्याने शेवटी जिल्हा परिषदेची सत्ता राखली जाणार की गमावली जाणार, याची हमी कोणीही स्पष्टपणे देऊ शकत नव्हते. तर इकडे राष्ट्रवादीची मोडकळीस आलेली अवस्था पाहून भाजपच्या गोटात आत्मविश्वास जाणवत होता. त्यातच पंढरपूर तालुक्यात गोपाळपूर गटातून भाजपने बालाजी अंकुशराव या दुहेरी हत्येचा आरोप असलेल्या एका तथाकथित शिक्षकाला बिनविरोध निवडून आणत विजयाची सलामी दिलीच होती.

तथापि, या निवडणुकीत मतदारांचीच कसोटी ठरली. जिल्हा परिषदेत भाजपपुरस्कृत महाआघाडीची सत्ता आल्यास शेवटी तेथील कारभाराची सूत्रे भाजपपेक्षा राष्ट्रवादीच्या ‘बाहेर’ राहिलेल्या तरुण तुर्काच्याच हाती राहण्याची शक्यता होती. तसे पाहता गेल्या पाच वर्षांत जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीचे बहुमत असले तरी प्रत्यक्षात आता भाजपशी घरोबा केलेल्या राष्ट्रवादी ‘बाहेरील’ मंडळींचाच प्रभाव होता. त्यातून कोणते कसकसे घोटाळे झाले, कोणी कशा प्रकारे मांडवल्या केल्या, त्यातून जिल्हा परिषदेचा कारभार कसा घसरला आणि एकूणच जिल्ह्य़ाच्या विकासावर कसा परिणाम झाला, याचा नेमका वस्तुपाठ मतदारांच्या समोर आला.

राष्ट्रवादीला ३० टक्के मते

या पाश्र्वभूमीवर मतदारांनी राष्ट्रवादीसह भाजपला योग्य धडा शिकविल्याचे दिसून येते. मावळत्या सभागृहात राष्ट्रवादीचे ६८ पैकी ३५ सदस्य होते. त्यात आता घट होऊन २६ सदस्य निवडून आले. यात माळशिरस व माढय़ाने पक्षाची अब्रू वाचविली आहे. तर बार्शी व  करमाळ्यात भाजप व पुरस्कृत आघाडीला रोखण्यात आले आहे. दुसरीकडे सभागृहात भाजपचा एकही सदस्य नसताना आता मात्र एकाचवेळी १४ सदस्य मतदारांनी भाजपला निवडून देताना सत्ता हिसकावून घेण्याची संधी दिली नाही. त्याचवेळी निर्विवाद बहुमत न मिळाल्याने काँंग्रेस व शेकापची साथ घेऊन राष्ट्रवादीने सत्तेचा सोपान गाठण्यापर्यंत मजल मारली आहे. राष्ट्रवादीच्या पारडय़ात ३० टक्के मते पडली तर भाजपला २४ टक्के मते मिळाली आहेत. अशा प्रकारे सत्ता कायम राखण्याइतपत राष्ट्रवादीने यश संपादन केले खरे; परंतु त्याचवेळी मोकाट फोफावलेल्या गटबाजीला अजिबात थारा न देता एकाच सूत्रात बांधून ठेवल्याशिवाय पर्याय नाही, असा जणू इशाराच या निवडणूक निकालाने दिला आहे.

सावध प्रचार

याउलट राष्ट्रवादीत कोठेही आक्रमकता न दिसता ज्या त्या तालुक्यात सुभेदारांनी सावध पावले टाकली. मात्र पक्षात एकसूत्रीपणाचा अभाव असल्याने शेवटी जिल्हा परिषदेची सत्ता राखली जाणार की गमावली जाणार, याची खात्री नव्हती. तर इकडे राष्ट्रवादीची मोडकळीस आलेली अवस्था पाहून भाजपच्या गोटात आत्मविश्वास जाणवत होता. त्यातच पंढरपूर तालुक्यात गोपाळपूर गटातून भाजपने बालाजी अंकुशराव या दुहेरी हत्येचा आरोप असलेल्या एका तथाकथित शिक्षकाला बिनविरोध निवडून आणत विजयाची सलामी दिलीच होती.