देशात अपारंपरिक पद्धतीने रेशीम उत्पादन घेणाऱ्या राज्यांमध्ये सातत्याने अव्वलस्थानी असलेल्या महाराष्ट्राने यंदा हे स्थान गमावले असून राज्याची धक्कादायकरीत्या चौथ्या स्थानी घसरण झाली आहे. केंद्रीय रेशीम मंडळाच्या अहवालानुसार आता अपारंपरिक पद्धतीने रेशीम उत्पादन घेणारे पहिल्या क्रमांकाचे राज्य उत्तर प्रदेश ठरले आहे. त्याखालोखाल मणीपूर आणि मध्यप्रदेश या राज्यांनी रेशीमचे उत्पादन घेतले आहे. या वर्षांत महाराष्ट्राला केवळ ८७.६० मेट्रिक टन रेशीम उत्पादित करता आले.
गेल्या वर्षी राज्यात रेशीमचे उत्पादन १६९.४१ मे.टन नोंदवले गेले होते. रेशीम उत्पादन व्यवसाय हा महत्वाचा कृषी कुटीर उद्योग मानला जातो. रेशीम कीडय़ांद्वारे रेशीम धाग्यांचे उत्पादन घेतले जाते. यात रेशीम कीडय़ांच्या संगोपनासाठी तुतीच्या झाडांची लागवड, कोषनिर्मिती, प्रक्रिया आणि विणकाम या प्रवासातून रेशीम तंतू निर्मिती होते. कर्नाटक, आंध्रप्रदेश, तमिळनाडू, प. बंगाल, जम्मू आणि काश्मीर या राज्यांमध्ये पारंपरिक पद्धतीने रेशीम उत्पादन घेतले जाते. इतर राज्यांमध्ये अपारंपरिक पद्धत वापरली जाते. तुती रेशीम विकास कार्यक्रम राज्यातील २३ जिल्ह्य़ांमध्ये राबवला जात आहे. राज्यातील हवामान रेशीम उद्योगास अनुकूलही आहे. ग्रामीण भागात रोजगार निर्मिती आणि आर्थिक प्रगतीची क्षमता या व्यवसायात आहे. मात्र, गेल्या तीन वर्षांपासून तुती लागवडीचे क्षेत्र सतत कमी होत आहे. २०११-१२ मध्ये राज्यात २ हजार ३२६ हेक्टर क्षेत्र तुती वृक्ष लागवडीखाली होते. त्याआधीच्या वर्षी लागवडीचे क्षेत्र २० टक्क्यांनी अधिक होते. कच्च्या रेशमाच्या उत्पादनातही सातत्याने घट दिसून आली आहे.
गेल्या वर्षी १६९.४१ मे.टन उत्पादन झाले ते यंदा ८७.६० मे.टनापर्यंत खाली घसरले. राज्यात टसर रेशीम विकास कार्यक्रम गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा आणि गोंदिया या चार राज्यांमध्ये राबवला जातो. टसर रेशीम कीडय़ांच्या संवर्धनासाठी आवश्यक ऐन या वृक्षांचे या चार जिल्ह्य़ांमधील लागवडीखालील क्षेत्र १८ हजार ८६६ हेक्टपर्यंत पोहोचले आहे. २०११-१२ मध्ये कच्च्या टसर रेशमाचे उत्पादन १२.३६ मे.टन इतके झाले होते. ते मात्र यंदा ९.७५ मे.टनापर्यंत खाली आले आहे. रेशीम उत्पादनासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळावे म्हणून सरकारी योजनांचा आधार देण्यात आला. अपारंपरिक पिकांव्यतिरिक्त रेशीम शेतीवर शेतकऱ्यांनी भर दिल्यास त्यांच्या आर्थिक उत्पन्नाचा स्रोत वाढण्यास मोठी मदत होईल आणि चीनमधील रेशीम आयातीला लगाम बसून या देशाबरोबरचा व्यापारी असमतोल टळेल, या दुहेरी उद्देशाने केंद्र सरकारने पाच वर्षांपूर्वी रेशीम शेतीबाबतची ध्येयधोरणे निश्चित केली. उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश यासारख्या राज्यांनी त्याचा लाभ घेत रेशीम उत्पादनात झेप घेतली. मात्र, महाराष्ट्र यात माघारल्याचे चित्र आहे. गेल्या दशकभराच्या काळात राज्यात भरघोस निधी आणि तुती लागवडीचा अधिक लक्ष्यांक देण्यात आला, पण रेशीम उत्पादनात वाढ न होता घट का झाली, याचे विश्लेषण आता केले जात आहे. यंदा उत्तर प्रदेशने १२३ मे.टन उत्पादन घेऊन महाराष्ट्राचे प्रथम स्थान हिरावून घेतले आहे. मणीपूरसारख्या राज्यानेही ११५ मे.टनापर्यंत उत्पादन घेऊन दुसऱ्या स्थानी उडी घेतली आहे. आतापर्यंत माघारलेल्या मध्यप्रदेशाने १०५ मे.टन उत्पादनाचे उद्दिष्ट साध्य केले आहे.
राज्यातील रेशीम उत्पादन
२००९-१०- २१८ मे.टन
२०१०-११- २१२ मे.टन
२०११-१२- १६९.४१ मे.टन
२०१२-१३- ८७.६० मे.टन