संगमनेर: घरोघरी दूरदर्शनचा पडदा पोहोचल्यानंतर काळाच्या ओघात संगमनेरमधील सर्व चित्रपटगृहे बंद पडली. पडद्यावर एखादा चित्रपट पाहायचा असेल, तर संगमनेरकरांना लोणी अथवा नाशिकला जावे लागत असे. या पार्श्वभूमीवर मालपाणी उद्योगसमूहाने दोन पडदे असलेले अत्याधुनिक चित्रपटगृह उभारल्याने ‘एकही चित्रपटगृह नसलेले शहर’ ही संगमनेरची ओळख आता पुसली जाणार आहे.
प्रवरा नदीच्या काठावर असलेले माधव चित्रमंदिर हे संगमनेरमधील सर्वांत जुने चित्रपटगृह होते. साधारण ५०-६० च्या दशकात सुरू झालेले हे चित्रपटगृह पुढे ४०–४५ वर्षे अविरतपणे सुरू होते. या काळातल्या तरुणांच्या अनेक कटू-गोड आठवणी या चित्रपटगृहाशी जोडलेल्या आहेत. आता वृद्धत्वाकडे झुकलेले तेव्हाचे तरुण आपल्या मर्मबंधातील ठेव मोठ्या उत्साहाने आजही सांगतात. एवढेच नाही, तर संगमनेर साखर कारखान्याच्या स्थापनेची अगदी प्रारंभीची सभादेखील याच चित्रपटगृहात झाली होती.
शहरातील मेन रोड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मार्गावर राजस्थान थिएटर हे संगमनेरमधले दुसरे चित्रपटगृह. शहराबरोबरच अगदी खेड्यापाड्यांतून मोठ्या पडद्यावरील चित्रपट पाहण्यासाठी आलेल्या रसिकांची मोठी झुंबड या दोन्ही सिनेमागृहांमध्ये असायची. गर्दी आटोक्यात आणण्यासाठी प्रत्येक ठिकाणी दोन पोलिसांची खास नियुक्ती केलेली होती. काळाच्या ओघात ही दोन्ही चित्रपटगृहे टप्प्याटप्प्याने बंद पडली. त्या जागी आता इमारती उभ्या आहेत. त्यानंतर घुलेवाडी येथे एक चित्रपटगृह सुरू झाले, सध्या तेही बंद अवस्थेत आहे. त्यामुळे एकही चित्रपटगृह नसलेले शहर अशी संगमनेरची थट्टा केली जात असे.
या पार्श्वभूमीवर शहरातून जाणाऱ्या पुणे-नाशिक मार्गालगत मालपाणी उद्योगसमूहाने अगदी महानगरांच्या धर्तीवर दोन स्वतंत्र पडद्यांवर चित्रपट पाहण्याची सुविधा असलेले अत्याधुनिक मल्टिप्लेक्स सिनेमागृह उभारले आहे. परिवारातील ज्येष्ठ सदस्या ललितादेवी व सुवर्णाकाकी मालपाणी यांच्या हस्ते त्याचे उद्घाटन झाले. थ्री डी आणि सामान्य अशा दोन स्वतंत्र पडद्यांवर रसिकांना नवनवीन चित्रपटांचा आनंद आता संगमनेरातच घेता येईल. एकाच वेळी दोन चित्रपटगृहे सुरू झाल्याने संगमनेरकरांना आता लोणी अथवा नाशिकला जावे लागणार नाही.
