वीजबिलांच्या मुद्द्यावरून राज्याच्या हिवाळी अधिवेशनामध्ये बरीच चर्चा झाल्याचं गेल्या दोन दिवसांत पाहायला मिळालं. विरोधी पक्षांकडून देखील या मुद्द्यावरून सरकारला धारेवर धरण्यात आल्याचं दिसून आलं. मात्र, यासोबतच थकित वीजबिलाची समस्या देखील गंभीर बनत असून त्यामुळे ग्राहक आणि वीज वितरण कंपनीचे पदाधिकारी यांच्यामध्ये वाद उफाळण्याच्या घटना वारंवार समोर येत आहेत. कधीकधी हे वाद इतके विकोपाला जातात, की थेट पोलिसांनाच मध्यस्थी करावी लागते. जळगावमध्ये देखील अशीच एक खळबळजनक घटना समोर आली असून एक ग्राहक महावितरणच्या पदाधिकाऱ्यांवर चक्क कुदळ घेऊन धावून गेल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शिवीगाळ आणि मारहाण..

थकित वीजबिलांच्या वसुलीसाठी जळगावमध्ये महावितरणकडून पदाधिकारी आणि कर्मचाऱ्यांचं पथक तयार करण्यात आलं आहे. या पथकानं शुक्रवारी जळगाव शहराच्या सिंधी कॉलनी परिसरामध्ये थकित वीजबिलांच्या वसुलीसाठी कारवाई करायला सुरुवात केली. मात्र, त्यांना भलत्याच प्रकाराला सामोरं जावं लागलं. थकीत वीज बिल वसुली साठी गेलेले महावितरणचे सहाय्यक अभियंता जयेश रजनीकांत तिवारी यांच्यासह त्यांच्या पथकाला शिवीगाळ व मारहाण झाल्याचा प्रकार घडला. या प्रकारामुळे खळबळ उडाली असून संबधितांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

तो हातात कुदळ घेऊन धावला आणि…

तिवारी यांचं पथक सिंधी कॉलनीत राहात असलेले किशोर टिकमदास पोपटानी यांच्याकडे वीजबिल वसुलीसाठी गेले असता पोपटानी संतप्त झाले. त्यांनी तिवारी यांच्या पथकाला शिवीगाळ करायला सुरुवात केली. एवढंच नाही, तर हातात कुदळ घेऊन ते थेट वीजबिल अधिकाऱ्यांच्या अंगावर धावून गेले. तेवढ्यात इतर कर्मचारी मध्ये पडले आणि त्यांनी पोपटानी यांच्या हातातली कुदळ काढून घेतली.

या प्रकारामुळे धास्तावलेले अधिकारी मागे सरकतात तोच पोपटानी यांनी बाजूला पडलेले दगड उचलून पथकावर मारायला सुरुवात केली. त्यांना आसपासच्या नागरिकांनी आणि इतर कर्मचाऱ्यांनी रोखून धरलं आणि बाजूला नेलं. या घटनेचा व्हिडीओ बनवणाऱ्या कर्मचाऱ्यांना देखील पोपटानी “बनाव व्हिडीओ..बनाव व्हिडीओ.. मेरे पैसे बाकी है क्या?” असं म्हणत असल्याचं व्हायरल व्हिडीओमध्ये दिसत आहे.

पोपटानी यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात

याप्रकरणी शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याने मारहाण करणाऱ्या किशोर टिकमदास पोपटानी यांच्या विरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना एमआयडीसी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दरम्यान या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने चांगलीच खळबळ उडाली आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Man attack mahavitaran employee with axe in jalgaon viral video pmw