‘मला हा आजार सहन होत नाही मला मारुन टाका’, अशी विनंती ती त्यांना रोज करत असे. तुझा आजार आज बरा होईल उद्या बरा होईल असे म्हणत ते तिला धीर देत असत. एक दोन नव्हे तर तब्बल २० वर्षे पत्नीने आपला आजार सहन केला. आजार बरं होण्याची आशा संपुष्टातही आली होती. तेव्हा, पत्नीचा आजार असह्य झाल्याचे पाहून पतीने तिची हत्या केली आणि नंतर आत्महत्या केली. या घटनेनी लातूरकरांचे मन हेलावले आहे.

पत्नीच्या आजार पणाला कंटाळून पतीने तिचं जीवन संपवलं आणि त्यानंतर स्वतः ही गळफास घेत आत्महत्या केली. मंगळवारी पहाटे ५.३० वाजण्याच्या सुमारस ही घटना घडली.  कलिंदाबाई आकनगिरे (६५) आणि हरिश्चंद्र आकनगिरे (७०) असं मृत दाम्पत्याच नाव आहे. शहरातील साईरोड परिसरात ते वास्तव्याला होते.

पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार कालिंदाबाई आकनगिरे या १९९७ पासून टीबी आणि कॅन्सर या आजाराने त्रस्त होत्या. आजारपणाच्या वेदना सहन होत नसल्याने त्या वारंवार जीवन संपवण्याची मागणी करायच्या. त्यांच्या आजारपणाला कंटाळून पती हरिश्चंद्र आकनगिरे यांनी त्यांचा खून केला. घटनेनंतर त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. एमआयडीसी पेलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. प्रकरणाचा तपास गुडमेवार हे करत आहेत.