Manikrao Kokate : महाराष्ट्र विधानसभेच्या अधिवेशनावेळी सभागृहात लक्षवेधी चालू असताना माणिकराव कोकाटे त्यांच्या बाकावर बसून मोबाइलवर ऑनलाइन रमी (पत्त्यांचा खेळ) खेळत असल्याचा कथित व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यांच्या या व्हिडीओनंतर विरोधकांनी सरकारविरोधात टीकेची झोड उठवली होती. त्यानंतर माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. अखेर माणिकराव कोकाटे यांना ऑनलाईन रमी खेळणं चांगलंच भोवलं आहे.

माणिकराव कोकाटे यांच्याकडील कृषीखातं काढण्यात आलं असून दत्तात्रय भरणे यांच्याकडील क्रीडा आणि युवक कल्याण खात्याची जबाबदारी आता माणिकराव कोकाटे यांच्याकडे देण्यात आली आहे. तर दत्तात्रय भरणे यांच्याकडे आता कृषीखातं देण्यात आलं आहे. दरम्यान, माणिकराव कोकाटे यांचं ‘सभागृहात रमी’ प्रकरण फक्त खातेबदलावर निभावल्यामुळे पुन्हा एकदा विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे यावरून आता पुन्हा राजकारण तापण्याची शक्यता आहे.

दतात्रय भरणे नवे कृषीमंत्री, तर कोकाटे क्रीडा मंत्री

दरम्यान, माणिकराव कोकाटे यांच्याकडील कृषीखातं काढून घेत या खात्याची जबाबदारी आता दतात्रय भरणे यांच्याकडे देण्यात आल्यामुळे आता दतात्रय भरणे राज्याचे नवे कृषीमंत्री असणार आहेत. तसेच माणिकराव कोकाटे आता राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री असणार आहेत. या संदर्भातील वृत्त एएनआयने एक्सवर (ट्विटर) दिलं आहे.

माणिकराव कोकाटेंनी काय स्पष्टीकरण दिलं होतं?

विधानसभेच्या अधिवेशनादरम्यान सभागृहात लक्षवेधी चालू असताना कृषीमंत्री माणिकराव कोकाटे त्यांच्या बाकावर बसून निवांतपणे मोबाइलवर ऑनलाइन रमी (पत्त्यांचा खेळ) खेळत असल्याचा कथित व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यानंतर माणिकराव कोकाटेंनी स्पष्टीकरण देताना म्हटलं होतं की, “माझ्या मोबाइलवर गेमचं पॉप अप आलं होतं जे मी स्किप करत होतो” असा दावा कोकाटे यांनी केला होता. कोकाटे म्हणाले होते, “फोन नवीन असल्यामुळे मला लगेच स्किप करता आलं नाही आणि तेवढ्यात कोणीतरी व्हिडीओ चित्रित करून तो व्हायरल केला. मी सभागृहात ऑनलाइन रमी खेळत नव्हतो. त्यामुळे मी राजीनामा देण्याचा प्रश्नच येत नाही”, असं म्हणत माणिकराव कोकाटे यांनी टीकाकारांना प्रत्युत्तर दिलं होतं.