Manikrao Kokate on Junglee Rummy Case: काही दिवसांपूर्वी कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. विधानपरिषदेतला हा व्हिडीओ असून त्यात माणिकराव कोकाटे मोबाईलमध्ये रमी खेळताना दिसत आहेत. मात्र, आपण रमी खेळत नव्हतो, असा दावा कोकाटेंनी केला आहे. यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी माणिकराव कोकाटेंवर परखड शब्दांत टीका केली होती. तसेच, कोकाटेंच्या राजीनाम्याचीही मागणी केली होती. आता माणिकराव कोकाटेंनीच रोहित पवारांच्या माफीनाम्याची मागणी केली आहे.
जंगली रमी प्रकरणी काय म्हणाले माणिकराव कोकाटे?
माणिकराव कोकाटेंनी आज न्यायालयात आपला जबाब नोंदवला. यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी त्यांची भूमिका सविस्तर मांडली. आपण रमी खेळतच नव्हतो, या आपल्या बाजूचा त्यांनी यावेळी पुनरुच्चार केला. तसेच, रोहित पवारांविरोधात न्यायालयात याचिका दाखल करण्याशिवाय आपल्याला पर्याय नव्हता, असं माणिकराव कोकाटे म्हणाले आहेत.
“हे आरोप झाले तेव्हा मी माझी भूमिका माध्यमांसमोर मांडली. मी रमी खेळत नव्हतो. मला रमी खेळता येत नाही. त्यानंतरही रोहित पवार यांनी सोशल मीडियावर पोस्ट करणं चालू ठेवलं. त्यानंतर मी आमचे वकील मनोज पिंगळे यांच्यामार्फत मी रोहित पवार यांना नोटीस पाठवली. शेतकऱ्यांमध्ये, माझ्या पक्षात बदनामी झाली आहे. माझ्या पक्षाच्या नेत्याची बदनामी झाली आहे. पर्यायाने माझीही बदनामी झाली आहे. माझी प्रतिमा डागाळली गेली आहे. अशा परिस्थितीत तुम्ही आमची माफी मागावी, असी नोटीस मी त्यांना पाठवली. पण त्यांनी त्या नोटीसची खिल्ली उडवली”, असं कोकाटे म्हणाले.
“अशा स्थितीत माझी बाजू लोकांसमोर मांडण्यासाठी मला न्यायालयात याचिका दाखल करण्याशिवाय पर्याय नव्हता. त्यानुसार आज न्यायालयात माझा जबाब नोंदवण्यात आला आहे”, असं ते म्हणाले.
माणिकराव कोकाटेंचे रोहित पवारांना उलटप्रश्न!
दरम्यान, माणिकराव कोकाटेंनी विधानपरिषदेत परवानगी नसताना आपला फोटो नेमका कुणी काढला? यासह रोहित पवारांना काही सवाल केले आहेत.
१. जर रोहित पवार विधानपरिषदेचे सदस्य नाहीत आणि त्यांना परिषदेत येण्याची परवानगी नाही, तर मग हा फोटो नेमका कुणी काढला? त्याचं नाव काय आहे?
२. रोहित पवारांना हा फोटो कसा आणि कुठून मिळाला?
३. विधानपरिषदेतील हा फोटो माध्यमांपर्यंत कसा पोहोचला?
“हे सारंकाही अद्याप गुलदस्त्यात आहे. त्याची चौकशी पोलिसांकडून चालू आहे. यासंदर्भातली माहिती रोहित पवारांनी त्यांच्या जबाबात नोंदवणं आवश्यक आहे”, असं माणिकराव कोकाटे यावेळी म्हणाले.