बहुजन समाज पक्ष स्व-खर्चाने तसेच स्वबळावर निवडणूक लढवत आहे. उत्तर प्रदेशमध्ये सत्तेत असताना बसपाने राज्यात अनेक आमूलाग्र बदल घडविले आहेत. महाराष्ट्रातील जनतेने भाजप तसेच अन्य काही राजकीय पक्षांच्या प्रलोभनांना बळी पडू नये, असे आवाहन बहुजन समाज पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा मायावती यांनी केले.
मंगळवारी नाशिकरोडच्या शिखरेवाडी मैदानात देवळाली मतदार संघातील पक्षाचे उमेदवार मुकुंद गांगुर्डे यांच्या प्रचारार्थ बसपाच्या अध्यक्षा मायावती यांची सभा झाली. साधारणत: चार तास उशिराने सभा सुरू झाल्याने नागरिकांना तसेच कार्यकर्त्यांना उन्हाचा तडाखा सहन करावा लागला. सभेला उशीर होत असल्याने नागरिकांनी तेथून काढता पाय घेतला. या वेळी मायावती यांनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपने ‘अच्छे दिन येणार’ असे आश्वासन दिले होते. मात्र ते पूर्ण करण्याच्या दृष्टीने केंद्रात काहीच हालचाल किंवा कामकाज दिसत नसल्याचा आरोप केला. आता भाजप महाराष्ट्रात सत्ता आणण्यासाठी विविध प्रलोभने दाखवत आहे. मतदारांनी मात्र यापासून सावध राहावे, असे आवाहन त्यांनी केले. स्वातंत्र्यापासून देशात आणि विविध राज्यांत काँग्रेस व भाजपची आलेली सरकारे ही धनदांडग्याच्या पैशांतून आली. मात्र बसपा असा एकमेव पक्ष आहे जो सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या पैशावर सत्तेत येतो. केंद्रात अनेक सरकारे आली, मात्र त्यात अल्पसंख्याक समाजाला प्राधान्य नसल्याने गरिबी दूर झालेली नाही. सरकारी नोकरीपासून जाणीवपूर्णक मागासवर्गीय समाजाला दूर ठेवले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. उच्च समाजाला आर्थिक आधारावर आरक्षण दिले पाहिजे, अशी मागणी अनेक वेळा केंद्राकडे केली. मात्र ती मान्य होत नाही असेही त्यांनी सांगितले. केंद्राच्या चुकीच्या आर्थिक धोरणांमुळे महागाई वाढत आहे. इतर राज्यांप्रमाणे महाराष्ट्रात भ्रष्टाचार बळावला आहे. लाच घेतल्याशिवाय कुठलेही काम होत नाही. बसपाच्या सत्ता काळात उत्तर प्रदेशमध्ये जातीय दंगली झाल्या नाहीत, गरिबांना घरे मिळाली तसेच भूमीहिनांना जमीन दिली गेली, राष्ट्रपुरुषांचा सन्मान राखला गेला याचे दाखले मायावतींनी दिले. विरोधकांच्या हे अद्याप पचनी पडत नसल्याचे सांगत भाजप आणि काँग्रेसवर त्यांनी टीकास्त्र सोडले.
संग्रहित लेख, दिनांक 8th Oct 2014 रोजी प्रकाशित
भाजपच्या प्रलोभनांना बळी पडू नये – मायावती
बहुजन समाज पक्ष स्व-खर्चाने तसेच स्वबळावर निवडणूक लढवत आहे. उत्तर प्रदेशमध्ये सत्तेत असताना बसपाने राज्यात अनेक आमूलाग्र बदल घडविले आहेत.

First published on: 08-10-2014 at 01:24 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mayawati urges nashik voters to reject bjp