रत्नागिरी :   रिफायनरीबाबत काही गैरसमज झाले असतील तर ते आधी दूर केले जातील. त्यासाठी लवकरच माझ्या दालनात बैठक घेतली जाईल, असे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी खेड येथे पत्रकारांशी बोलताना नमूद केले.    शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर सामंत यांचे रविवारी दुपारी जिल्ह्यात आगमन झाले. या दौऱ्यात असतानाच त्यांना उद्योगमंत्रीपद मिळाल्याचे वृत्त आले. या पार्श्वभूमीवर सामंत म्हणाले की, कोकणातच नव्हे तर महाराष्ट्रातही मोठय़ा प्रमाणात बेरोजगारी आहे. उद्योग खात्याच्या माध्यमातून जास्तीत जास्त प्रकल्प आणून बेरोजगारी दूर करण्यासाठी माझे प्रयत्न राहतील. आज जो काही महाराष्ट्र पाचव्या- सहाव्या क्रमांकावर आहे, त्याला परत पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करू. बेरोजगारी दूर करणे काळाची गरज बनलेली आहे. उद्योगमंत्रीपद कोकणाला दिले आहे. त्या माध्यमातून जास्तीत जास्त बेरोजगारी दूर करण्यासाठी प्रयत्न करणे आमची जबाबदारी आहे. रिफायनरीबाबत काही गैरसमज झाले असतील ते आधी दूर केले जातील. कोकणात आलेल्या प्रकल्पाचे समर्थन केले पाहिजे. कोकणातील हजारो युवक युवती बेरोजगार आहेत. त्यांच्यासाठी कोकणात चांगले प्रकल्प आणले जातील. रिफायनरीविषयी गैरसमज दूर करण्यासाठी संबंधित लोकांची बैठक माझ्या दालनात घेण्यात येईल. कोकणात रिफायनरीच नव्हे, तर प्रत्येक प्रकल्प आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. या व्यतिरिक्त कोणते प्रकल्प कोकणात आणणे शक्य आहे, त्याचा अभ्यास करून लवकरच त्यादृष्टीने निर्णय घेतले जातील.    राष्ट्रीय महामार्गावरील कशेडी ते राजापूर भागातील समस्या सोडवण्यासाठी वेळ पडल्यास आमदार योगेश कदम व मी स्वत: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊ. चौपदरीकरणाच्या कामाबाबत, महामार्ग बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांबाबत लोकप्रतिनिधींच्या अनेक तक्रारी आहेत. महामार्गावर प्रचंड खड्डे पडलेले असल्याने गणपतीत प्रवास सुखकर होण्यासाठी तत्काळ उपाययोजनांच्या सूचना अधिकाऱ्यांना करणार आहे. कोकणातील जनता म्हणून आमच्या जिव्हाळय़ाचा विषय मुंबई – गोवा महामार्ग हा असून या मार्गाची मी पाहणी करत आहे. परशुराम घाट व पर्यायी मार्ग वाहतुकीस सुलभ राहावा म्हणून कोणत्या प्रकारे निधी खर्च करता येईल हे तपासून पाहणे गरजेचे आहे, असे मत सामंत यांनी व्यक्त केले.   शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आम्ही पुढे घेऊन जात आहोत. शिवसेना भक्कम करण्यासाठी आम्ही कटिबद्ध असून कोणी संभ्रम पसरवत असतील तर त्यावर कार्यकर्त्यांनी विश्वास ठेवू नये. आगामी काळात कोकणात पक्ष संघटन अधिक बळकट करण्यासाठी चिपळूण, रत्नागिरी व सिंधुदुर्ग येथे मध्यवर्ती कार्यालये सुरू केली जाणार आहेत, असेही सामंत यांनी सांगितले. सामंत यांच्या स्वागतासाठी रत्नागिरी जिल्ह्याची सीमा असलेल्या खेड तालुक्यातील कशेडी घाट येथे शेकडो कार्यकर्ते पोहोचले. सामंत यांनी श्री काळकाई देवीचे दर्शन घेतले. राज्य मंत्रिमंडळात उद्योगमंत्री म्हणून समावेश झाल्यानंतर उदय सामंत यांचे खेडमध्ये आमदार योगेश कदम व कार्यकर्त्यांनी जल्लोषात स्वागत झाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Meeting soon to clear misunderstandings about refinery says industries minister uday samant zws
First published on: 15-08-2022 at 02:04 IST