तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव ( केसीआर ) मंगळवारी ( २७ जून ) पंढरपूर दौऱ्यावर आहेत. केसीआर पंढपुरात श्री. विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेणार आहेत. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते भगिरथ भालके भारत राष्ट्र समिती ( बीएसआर ) पक्षात प्रवेश करणार आहेत. तर, दुसरीकडे तेलंगणातील माजी मंत्री आणि खासदाराने काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केसीआर यांना लक्ष्य केलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ट्वीट करत जितेंद्र आव्हाड म्हणाले, “केसीआर यांचे तेलंगणामधील अस्तित्वच धोक्यात आले आहे. त्यांचे खासदार त्यांना सोडून जात आहेत. कार्यकर्ते वेगवेगळ्या पक्षाच्या मार्गावर आहेत. घरामध्ये भांडणे लागली आहेत. अशा परिस्थितीत स्वत:चे घर न सांभाळू शकलेल्या केसीआर ने ४०० ते ५०० गाड्या घेऊन आपल्या श्रीमंतीचा तमाशा महाराष्ट्राला दाखवावा हे दुर्देवी आहे.

हेही वाचा : संभाजी भिडे यांच्या ‘त्या’ वक्तव्यावर ठाकरे गटाच्या नेत्याची टीका; म्हणाले…

“ते विठ्ठलाचे दर्शन घेणार आहेत, असे सांगितले जाते. विठ्ठल त्यांना सद्बुद्धी देवो आणि पहिले जाऊन ते हैदराबादमध्ये बसून पुरोगामी महाराष्ट्राचा अभ्यास करो, ही बुद्धी देखील विठ्ठलाने त्यांना द्यावी. या विठ्ठलाचे दर्शन घ्या आणि परत जा,” असा सल्लाही जितेंद्र आव्हाड यांनी केसीआर यांना दिला आहे.

हेही वाचा : “…याची लाज सरकारला वाटायला हवी”, ठाकरे गटाचा शिंदे-फडणवीसांवर हल्लाबोल; ‘त्या’ घोषणेची करून दिली आठवण!

दरम्यान, सहाशे गाड्यांच्या ताफ्यासह केसीआर तेलंगणाचे मंत्रिमंडळ घेऊन महाराष्ट्रात आले आहेत. दुसरीकडे दिल्लीमध्ये मात्र त्यांच्या पक्षाला खिंडार पडले. एक माजी खासदार, १२ माजी मंत्र्यांसह पक्षाच्या ३५ नेत्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करत राव यांना धक्का दिला आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mla jitendra awhad taunt telangana cm kcr over maharashtra tour ssa