कराड : स्वातंत्र्य संग्रामात पुसेसावळी भागातून शेकडो स्वातंत्र्य सैनिकांनी सहभाग घेतला, त्यातील अनेकजण शहीद झाले. त्यांच्या स्मृती कायम ठेवून पुढील पिढीने त्यांचा आदर्श घ्यावा, असे आवाहन आमदार मनोज घोरपडे यांनी केले. वडगाव जयराम स्वामी (ता. खटाव) येथे स्वातंत्र्य लढ्यातील हुतात्म्यांना अभिवादन कार्यक्रमात ते बोलत होते. आमदार महेश शिंदे, माजी मंत्री बाळासाहेब पाटील, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रणजितसिंह देशमुख, सोनिया गोरे, धैर्यशील कदम, प्रांताधिकारी उज्वला गाडेकर, तहसीलदार बाई माने, जयराम स्वामी मठाचे मठाधीपती विठ्ठल स्वामी, गुरुवर्य दादा महाराज आदींची या वेळी प्रमुख उपस्थिती होती.
आमदार घोरपडे पुढे म्हणाले, देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी प्राणाचे बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांच्या स्मृती पुढील पिढीला आदर्श ठराव्यात म्हणून खटाव तालुक्यात हुतात्मा स्मारके बांधली गेली आहेत.आमदार महेश शिंदे म्हणाले, हुतात्म्यांमुळे देशाला स्वातंत्र्य मिळाले. त्यामुळे त्यांच्या विचारांचा वारसा पुढे चालण्यासाठी हुतात्मा दिनास उत्सवाचे स्वरूप द्यावे. जयराम स्वामी मठाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा करू तसेच पाणी प्रश्नासाठी पुढाकार घेऊन राहिलेली कामे आमदार मनोज घोरपडे यांच्या माध्यमातून मार्गी लावली जातील.
बाळासाहेब पाटील म्हणाले, हुतात्म्यांची पावन भूमी असलेल्या जयराम स्वामी वडगावमध्ये दरवर्षी नऊ सप्टेंबर रोजी हुतात्मा क्रांती प्रतिष्ठानतर्फे कार्यक्रम घेतला जातो. त्यास गेल्या अनेक वर्षापासून उपस्थित राहण्याचे भाग्य लाभत आहे. हुतात्म्यांच्या स्मृती जागविण्याचे काम या माध्यमातून व्हावे.सोनिया गोरे म्हणाल्या की, जयराम स्वामी वडगावला ‘ब’ वर्ग दर्जा देऊन पाच कोटींचा निधी मंजूर केला जाईल, अशी गाव्ही मंत्री जयकुमार गोरे यांच्याकडून घेतली असून, येणाऱ्या काळात आमदार मनोज घोरपडे यांच्या माध्यमातून वडगावचा विकास केला जाईल.
धैर्यशील कदम, रणजितसिंह देशमुख, बंडा गोडसे आदींची या वेळी भाषणे झाली. कार्यक्रमाला पोलीस निरीक्षक गणेश वाघमोडे, गटविकास अधिकारी योगेश कदम, जितेंद्र पवार, भाग्यश्री भाग्यवंत, विक्रमशील कदम, प्रकाश घार्गे, संतोष घार्गे, महेश घार्गे, श्रीकांत पिसाळ यांच्यासह स्वातंत्र्य सैनिक, हुतात्म्यांचे वारसदार, स्थानिक नेते, ग्रामस्थ व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक सुहास शिंदे यांनी तर विकास घार्गे यांनी आभार मानले.
स्वातंत्र्य संग्रामात पुसेसावळी भागातून शेकडो स्वातंत्र्य सैनिकांनी सहभाग घेतला, त्यातील अनेकजण शहीद झाले. त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित केला होता.