महाराष्ट्र नविनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांची १ मे रोजी औरंगाबादमध्ये सभा होत आहे. या सभेसाठी आज ते पुण्यावरून औरंगाबादच्या दिशेने रवाना देखील होत आहेत. राज ठाकरेंच्या या सभेबाबत सर्वांनाच उत्सुकता आहे. शिवाय, या सभेच्या अगोदर देखील परवानगी नाट्य रंगल्याचं दिसून आलं होतं, अखेर ही सभा नियम आणि अटींसह होणार आहे. औरंगाबादेतील राजकीय परिस्थिती पाहता, राज ठाकरे नेमकं काय बोलतील आणि त्याचे काय पडसाद उमटू शकतात, याबाबत देखील चर्चा सुरू आहे. दरम्यान, औरंगाबादचे एमआयएम पक्षाचे खासदार इम्तियाज जलील यांनी राज ठाकरे यांना या बहुचर्चित सभेअगोदर इफ्तार पार्टीचे आमंत्रण दिले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

याचबरोबर राज ठाकरे यांच्या सभेच्या पार्श्वभूमीवर खासदार जलील यांनी काल औरंगाबादचे पोलीस आयुक्त निखील गुप्ता यांची देखील भेट घेतली आहे.

खासदार जलील यांना पोलीस आयुक्तांची भेट घेतल्यानंतर माध्यमांना सांगितले की, “मी आज पोलीस आयुक्तांची भेट घेण्यासाठी इथे आलो होतो आणि त्यांच्याशी चर्चा केली. त्यांना हे देखील सांगितले आहे की, आपल्या शहरात शांतात आणि सुव्यवस्था राहावी यासाठी आमची कशाप्रकारे तुम्हाला मदत अपेक्षित आहे ते तुम्ही सांगावं.”

“राज ठाकरे यांची इथे सभा होणार आहे, मी त्यांना एवढच सांगू इच्छितो की १ तारखेला तुमची मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर सभा होणार आहे. साडे सात वाजता तुमची सभा आहे, त्या सभेपूर्वी हिंदू-मुस्लीम एकतेसाठी इफ्तार पार्टीचं आयोजन केलं आहे. हिंदू-मुस्लीम एकत्र येऊन इफ्तार करु, यामधून एक चांगला संदेश जाईल.” असं म्हणत जलील यांनी या इफ्तार पार्टीत सहभागी होण्याचं राज ठाकरे यांना आमंत्रण दिलं. 

“९९ टक्के लोक शांतात प्रेमी आहेत, केवळ एक टक्का लोक अडथळे निर्माण करतात. माझा विश्वास आहे की पोलीस अशा १ टक्के लोकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी सक्षम आहे. मग ते कोणत्या पक्षाचे, समुदायाचे आहेत त्याने काही फरक पडणार नाही. जे राजकारण करण्यासाठी आले आहेत त्यांना राजकारण करावं, जे प्रार्थना करू इच्छितात त्यांना प्रार्थना करू द्यावी. असंही खासदार जलील यांनी बोलून दाखवलं आहे. ”

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mp imtizay jalil invites raj thackeray to iftar party before meeting in aurangabad msr