धाराशिव जिल्हा हा ठाकरेसेनेचा बालेकिल्ला राहिला आहे. लोकसभा निवडणुकीपाठोपाठ विधानसभा निवडणुकीतही महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या ठाकरेंच्या शिवसेनेला जिल्ह्यातील मतदारांनी प्रचंड समर्थन दिले. निवडणुकांचा धुराळा आता खाली बसला आहे. अनेकांना सत्तेचे लाभ खुणावू लागले आहेत. त्यातच पालकमंत्री म्हणून पहिल्याच दौर्‍यावर असलेल्या परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी खळबळजनक वक्तव्य करीत जिल्ह्यातील राजकारणाला हादरा दिला आहे. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर हे महायुतीचेच असल्याचा दावा करीत पालकमंत्री सरनाईक यांनी जणू ऑपरेशन टायगरचे संकेत दिले आहेत. सरनाईक यांचा हा व्हिडीओ सध्या समाजमाध्यमांमध्ये वेगाने व्हायरल होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

धाराशिव जिल्ह्यात एकूण चार विधानसभा मतदारसंघ आहेत. त्यापैकी महायुतीचे दोन आणि महाविकास आघाडीचे दोन उमेदवार विधानसभा निवडणुकीत विजयी झाले. लोकसभेतही महाविकास आघाडीचे प्रतिनिधी असलेल्या ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांना भरभरून मताधिक्य मिळाले. महायुतीपैकी शिंदे सेनेचे माजी मंत्री तानाजी सावंत आणि भाजपाकडून राणाजगजितसिंह पाटील यांनी आपला मतदारसंघ राखण्यात यश मिळविले. तर शिंदे सेनेच्या ज्ञानराज चौगुलेंना पराभूत करीत ठाकरेंनी उमरग्याचा मतदारसंघ राखला. नवखे प्रवीण स्वामी विजयी झाले. धाराशिव-कळंब विधानसभा मतदारसंघातही गुवाहाटी मार्गे झालेल्या राजकीय प्रवासादरम्यान पलायन करून परत आलेले कैलास पाटील राज्याच्या पटलावर चांगलेच चर्चेत आले.

प्रवीण स्वामी आणि कैलास पाटील हे दोन ठाकरेंचे शिलेदार धाराशिव जिल्ह्यात आहेत. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत हे सर्वजण उपस्थित असताना, पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्याकडे अंगुली निर्देश करीत हे महायुतीचेच असल्याचे जाहीर वक्तव्य केले. त्याचा व्हिडीओ सध्या जिल्ह्यात चर्चेचा विषय बनला आहे. त्याचबरोबर ऑपरेशन टायगर धाराशिव जिल्ह्यातही अनेक धक्कादायक बदल घडवून आणेल. महत्वाच्या नेत्यांचे प्रवेश होणार आहेत. त्यामुळे धाराशिव जिल्ह्यात धक्कादायक चित्र पहावयास मिळाले, तर आश्चर्य वाटता कामा नये, अशा शब्दांतही पालकमंत्री सरनाईक यांनी आगामी राजकीय समिकरणाचे जाहीर संकेत दिले आहेत. त्यामुळे ठाकरेंचा कोणता शिलेदार शिंदे सेनेच्या गळाला लागणार, हे येणारा काळच ठरवेल.

कसलाही राजकीय भूकंप होणार नाही

पालकमंत्री सरनाईक यांच्या जाहीर वक्तव्यामुळे जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. त्यामुळे ठाकरेंचे आमदार कैलास पाटील यांनी यावर पहिल्यांदा जाहीर स्पष्टीकरण दिले. यापूर्वीही ठाकरेंसोबत होतो आणि पुढेही राहणार, असे म्हणत त्यांनी चर्चेला पूर्णविराम दिला. त्यानंतर खासदार ओमराजे यांनीही पक्षांतराच्या चर्चा निराधार असल्याचे सांगत विरोधात राहून संघर्ष करणार, ठाकरेंची सोबत सोडणार नसल्याचे जाहीर केले. दरम्यान शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या स्मृतिदिनाची पोस्ट खासदार राजेनिंबाळकर यांनी त्यांच्या समाजमाध्यमाच्या खात्यावरून व्हायरल केली आहे. त्यात उध्दव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचे फोटो नसल्यामुळेही पुन्हा चर्चेने जोर धरला आहे.

माजी पालकमंत्र्यांची अनुपस्थिती जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा शिंदेसेनेचे आमदार प्रा. डॉ. तानाजी सावंत हे पालकमंत्री यांच्या पहिल्याच दौर्‍याला गैरहजर होते. त्यांच्या गैरहजेरीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट करण्यात आलेले नाही. मात्र विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर तानाजी सावंत यांचे जिल्ह्यात जाहीर कार्यक्रमाच्या निमित्ताने आगमन झालेले नाही. माजी मंत्री तानाजी सावंत यांचा आदर करा, अशा शब्दांत पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी आपल्या पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना सूचना दिल्या आहेत. त्यामुळे माजी आणि आजी पालकमंत्री यांच्यात पुढील काळात नेमके कसे सख्य राहणार, हेही येणारा काळच ठरवणार आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mp omprakash rajenimbalkar belongs to mahayuti claim by minister pratap sarnaik zws