सांगली : आपत्ती काळात प्रशासनाकडून देण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करून सहकार्य करावे, अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन महापालिका आयुक्त सत्यम गांधी यांनी शनिवारी केले.आपत्ती व्यवस्थापनांतर्गत महापालिका प्रशासन, पोलीस व महसूल विभाग यांची तातडीची बैठक शनिवारी महापालिकेच्या मंगलधाम कार्यालयात पार पडली. या वेळी ते बोलत होते. पोलीस उप अधीक्षक आर. विमला, अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, उपायुक्त शिल्पा दरेकर, स्मूर्ती पाटील, विजया यादव, वैभव साबळे, गृह उपअधीक्षक दादासाहेब चुडापा आदी उपस्थित होते.
या बैठकीत आपत्कालीन उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली. संकट काळात नागरिकांपर्यंत वस्तुस्थिती पोहोचविण्यावर भर देऊन अफवा पसरणार नाहीत, याची काळजी घेण्याबाबत योग्य ती भूमिका घेण्याचे निश्चित करण्यात आले. समाजमाध्यमाद्वारे प्रसारित होणारी माहिती अपुऱ्या माहितीवर आधारित असण्याची शक्यता अधिक असल्याने नागरिकांनी यावर विश्वास न ठेवता प्रशासनाशी संपर्क साधून खात्री करावी, असे आवाहन या वेळी करण्यात आले.
अफवा पसरविल्या जाणार नाहीत यावर पोलिसांची करडी नजर असणार आहे. दोन समाजांत गैरसमज पसरवून द्वेष निर्माण होणार नाही याची दक्षता सर्वांनीच घ्यावी, असे आवाहन या वेळी करण्यात आले. आक्षेपार्ह मजकुराचे संदेश समाजमाध्यमात आढळल्यास तत्काळ पोलिसांशी संपर्क साधावा,असेही सांगण्यात आले.शहरात फलक, बॅनर लावण्यासाठी प्रशासनाची रीतसर परवानगी घ्यावी अन्यथा कायदेशीर कारवाईस सामोरे जावे लागेल, असा इशाराही आयुक्त गांधी यांनी या वेळी दिला.