बंडखोरी टाळणे आणि आयारामांना संधीचे कारण

बंडखोरी टाळण्यासाठी आणि आयारामांना संधी देता यावी यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी अंतिम क्षणी उमेदवारांची यादी जाहीर करण्याचे धोरण स्वीकारले आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी उमेदवारी दाखल करण्यास केवळ दोन दिवसांचा अवधी उरला असतानाही अद्याप उमेदवारीची घोषणा नसल्याने इच्छुक आणि बंडखोरी कशी टाळता येईल याच्या चिंतेने काँग्रेस, राष्ट्रवादी आणि भाजपाला ग्रासले आहे. मिरज तालुका वगळता अन्य ९ तालुकाध्यक्षांकडे काँग्रेसने एबी फॉर्म आज सुपुर्द केले असून मिरजेबाबत रविवारी बठक होणार आहे.

जिल्हा परिषदेच्या ६० आणि १० पंचायत समितीच्या १२० जागांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया १ फेबुवारीपासून सुरू झाली आहे. सोमवार, दि. ६ फेब्रुवारी दुपारी ३ वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत असून उद्या रविवार असूनही उमेदवारी अर्ज ऑनलाईन दाखल करण्याची मुभा आयोगाने दिली आहे. शनिवारी मिरज तालुक्यातून जिल्हा परिषदेसाठी ४ आणि पंचायत समितीसाठी ७ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत, तर तासगाव तालुक्यात जिल्हा परिषदेसाठी ६ आणि पंचायत समितीसाठी ५ उमेदवारांनी आज अर्ज दाखल केले.

राजकीय पक्षांची उमेदवारी यादी जाहीर करण्यास विलंब होत असला तरी उमेदवारांनी यावर तोडगा काढत एक अपक्ष आणि एक राजकीय पक्षाच्या नावाने उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. उमेदवारी दाखल करण्याच्या गेल्या ५ दिवसात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या १८० जागांसाठी ६० हून अधिक उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.

भाजपा उमेदवारांच्या यादीला प्रदेश समितीने मान्यता दिली असली तरी अद्याप मित्र पक्षांना कोणत्या जागा सोडायच्या यावर अंतिम यादी रखडली आहे. रविवार दुपापर्यंत भाजपाची यादी जाहीर करण्यात येणार असल्याचे पक्षाचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांनी आज सांगितले. तर राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष विलासराव िशदे यांनी आपल्या पक्षाची यादी सोमवारी जाहीर करण्यात येणार असल्याचे सांगितले.

काँग्रेसमध्ये उमेदवार निश्चिती करण्यात आली असली तरी मिरज तालुक्यातील उमेदवारीवरून पक्षांतर्गत मतभेद उफाळून आले आहेत. मिरज तालुक्यात उमेदवार यादीवरून दादा घराण्यातच मतभेद निर्माण झाले असून एरंडोली, समडोळी आणि भोसे जिल्हा परिषद गटामध्ये मदन पाटील व विशाल पाटील गटामध्ये वाद उफाळून आला आहे. जिल्हा परिषदेच्या ११ आणि पंचायत समितीच्या २२ जागापकी ९ गटातील जागांची मागणी मदन पाटील यांच्या गटाने केली आहे. काही ठिकाणी स्वाभिमानीशी आणि काही ठिकाणी राष्ट्रवादीशी तडजोड करण्याची तयारी काँग्रेसमधील एका गटाची आहे.

या पाश्र्वभूमीवर काँग्रेसची अंतिम यादीही रखडली आहे. उमेदवारांच्या नावाची घोषणा अंतिम क्षणी म्हणजे सोमवारी दुपारी करण्यात येईल असे कोअर कमिटीचे अध्यक्ष डॉ. पतंगराव कदम यांनी जाहीर केले आहे. शनिवारी मिरज तालुका वगळता अन्य तालुक्यातील अध्यक्षांकडे एबी फॉर्म देण्यात आले आहेत.

मिरजेबाबत मदन पाटील व विशाल पाटील या दादा घराण्यातच उमेदवारीवरून वाद निर्माण झाला असून अद्याप यावर तोडगा निघालेला नाही.