करोना लॉकडाउनमुळे मागील दोन महिन्यांपासून गुन्हेगारी दृष्ट्या काहीसे शांत असणाऱ्या साताऱ्यात बुधवारी रात्री एकाचा खून तर वाई येथे युवकांच्या किरकोळ वादवादीतून गोळीबाराची घटना घडली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सातारा येथील वाढे फाटा परिसरात वेण्णा नदीच्या लगत बुधवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास एका युवकाच्या डोक्यात दुसऱ्या युवकाने दगड घालून खून केल्याची घटना उघडकीस आली. सूरज मारुती निगडे (वय २७,रा. करिश्मा हाईट, सदरबझार) असे मृत युवकाचे नाव असून संशयीत आरोपी स्वतःहुन सातारा तालुका पोलिसात हजर झाला आहे.

साताऱ्यात बुधवरपासून दारूची दुकाने उघडली आहेत.  प्राप्त माहितीनुसार, सूरज मारुती निगडे आणि दीपक विश्वनाथ दया (वय २८ मूळ रा. नाशिक, सध्या वाढेफाटा) या दोघांनी दारू पिण्याचे ठरवले. त्यानंतर सायकांळी वेण्णा नदीलगत नशेत असताना सायकल देण्याघेण्यावरून त्यांच्यात वाद सुरू झाला. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. इतक्यात बाजुलाच पडलेला दगड उचलून दीपकने सुरजच्या डोक्यात घातला. संतापाच्या व नशेच्या भरात त्याने एवढे दगडाचे घाव घातले की सुरजचा चेहरा छिन्न विच्छन झाला. घटनास्थळी काही वेळातच त्याचा मृत्यू झाला. तो महामार्गावर एका ढाब्यावर काम करत होता. तेथेच मृत युवकाची ओळख झाली होती. पहाटे जेव्हा दीपक शुद्धीत आला तेव्हा त्याने पोलीस स्टेशन गाठले.  सातारा तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक सज्जन हंकारे, सहाय्यक निरिक्षक अमित पाटील, हवालदार राजू मुल्लाणी या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.

तर दुसरीकडे वाई येथील रविवार पेठेत युवकांच्या दोन गटातील किरकोळ वादातून झालेल्या गोळीबारात एक जण गंभीर जखमी झाला. याप्रकरणी पोलिसात परस्पर विरोधी तक्रारी दाखल झाल्या असून एका गटातील चार जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. वाई एमआयडीसी रस्त्याला ढगे आळी भागात बंटी जाधव (रा.भुईंज) याने मोटारीतून युवकांसह येत अभिजीत लोखंडे याच्यासह घरासमोर बसलेल्या युवकावर गोळीबार केला. यावेळी झालेल्या झटापटीत अर्जुन उर्फ राणा यादव याने हातावर काठी मारल्याने बंटी जाधवच्या हातातील पिस्तूल खाली पडली. ती अर्जुनने घेऊन बंटी जाधव व त्याच्या मित्रांवर गोळीबार केला. यावेळी एक गोळी भैया मोरे याच्या छातीच्या खालील भागास लागल्याने तो गंभीर जखमी झाला. त्याला सुरवातीला सातारा येथे व नंतर पुण्याला दाखल केले आहे. मागील चार-पाच दिवसांपासून सोन्या शिंदे व अभिजित लोखंडे यांच्यामध्ये व्हॉट्सअप ग्रुप मधील मजकुरावरून वाद होता. या दोघांमधील जुने वादही याला कारण होते. बुधवारी दुपारपासून यांच्यातील वाद विकोपाला गेले होते,यातून गोळीबाराचा प्रकार घडला.

गोळीबार झाल्याचे समजताच पोलीस निरीक्षक आनंदराव खोबरे, सहायक निरीक्षक आशीष कांबळे,  उपनिरीक्षक राजेंद्र कदम संजय मोतेवार, कर्मचाऱ्यासह दाखल झाले. ते चौकशी करत असताना पोलीस उपअधीक्षक अजित टिके, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते दाखल झाले. या अनुषंगाने अनेकांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता गुन्ह्याची माहिती उघडकीस आली.

याप्रकरणी दिलीप बाजीराव मोरे (गंगापुरी,वाई) याने अभिजित लोखंडेसह इतरांवर तर अर्जुन यादव याने अनिकेत उर्फ बंटी नारायण जाधव, सोन्या शिंदे ,अभिजित मोरे आदींवर गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याची उकल करण्यासाठी पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील बुधवारी रात्री व गुरुवारी दिवसभर वाईत तळ ठोकून आहेत. याप्रकरणी पोलीसानी अभिजीत लोखंडे, अर्जुन उर्फ राणा यादव, विजय अंकुशी, नितीन भोसले, सुनील जाधव यांना अटक केली आहे. दुसऱ्या गटातील लोक फरार असून त्यांना शोध घेण्यासाठी पोलीस पथके रवाना केली आहेत.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Murder in satara firing in wai msr