नागपूर शहरानजीक कनान गावामध्ये एका जातीच्या जमावाने केलेल्या हल्ल्यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला. मोहनीश रेड्डी असे या व्यक्तीचे नाव आहे. रेड्डी याच्यावर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हे दाखल आहेत.
जमावातील लोकांचा आधीपासून रेड्डी याच्यावर राग होता. त्यातच बुधवारी सकाळी जमावातील लोकांनी रेड्डी याच्या घरावर हल्ला चढवून त्याला मारण्यास सुरुवात केली. यावेळी घरामध्ये रेड्डी याचा मोठा भाऊ मोहन त्यांची पत्नी निलिमा, बहीण रिमा व धनलक्ष्मी आणि आई उषा हे देखील होते. हल्ल्यामध्ये हे सर्वजण जखमी झाले आहेत. स्वतःच्या बचावासाठी मोहनीश याने त्याच्याकडील देशी कट्ट्यातून जमावावर गोळीबार केला. त्यामध्ये काहीजण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. जमाव सुमारे एक तास रेड्डी याला मारत होता, असे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले. पोलीस आल्यानंतर रेड्डीला कामठीच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारांपूर्वीच त्याला मृत घोषित करण्यात आले. याप्रकरणी पोलीसांनी जमावातील व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.