भारतातील अमेरिकेच्या राजदूत नॅन्सी पॉवेल यांनी मंगळवारी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची सह्याद्री अतिथीगृह येथे भेट घेतली. नॅन्सी पॉवेल मे अखेर निवृत्त होत असून, निरोप घेण्यासाठी ही भेट होती. यावेळी मुख्यमंत्र्यांनी त्यांना अजिंठा येथील महापद्मपाणीची प्रतिकृती भेट दिली.
महाराष्ट्र सरकारने येथील वाणिज्यदूत कार्यालयास त्याचप्रमाणे अमेरिकन वकिलातीच्या विविध उपक्रमांना नेहमीच सहकार्य केले आहे, पुढे देखील ते सुरुच राहील अशी आशा यावेळी बोलतांना पॉवेल यांनी व्यक्त केली. महाराष्ट्राने गेल्या काही वर्षात केलेल्या औद्योगिक प्रगतीची प्रशंसा करताना त्यांनी प्रामुख्याने पुणे आणि नागपूरचा उल्लेख केला.
यावेळी मुख्यमंत्र्यांसमवेत त्यांची देशातील लोकसभा निवडणुका, निवडणुकीनंतरचे दोन्ही देशातील संबंध, एकूणच अर्थव्यवस्था तसेच औद्योगिक विकास, शैक्षणिक प्रगती अशा विविध विषयांवर चर्चा झाली.
अमेरिकन विद्यापीठांनी भारतातील विद्यार्थ्यांसाठी कॅम्पस उघडण्याची गरज आहे, जेणेकरून जागतिक दर्जाचे अभ्यासक्रम येथील विद्यार्थ्यांना शिकता येतील, असे सांगून चव्हाण म्हणाले, राज्य सरकारने शिक्षणाचा दर्जा उंचावण्यावर त्याचप्रमाणे मागास भागाचा देखील विकास व्हावा या दृष्टीने महत्त्वाची पावले टाकली आहेत. दिल्ली-मुंबई औद्योगिक कॉरिडॉरमुळे होणाऱ्या प्रगतीबाबत पॉवेल यांनी विचारणा केली असता मुख्यमंत्र्यांनी पुण्या-मुंबईच्या जोडीने नागपूर, नाशिक, औरंगाबाद या ठिकाणचाही औद्योगिक विकास होत असल्याची माहिती दिली.
याप्रसंगी राजशिष्टाचार मंत्री सुरेश शेट्टी, राजशिष्टाचार विभागाचे अपर मुख्य सचिव सुमित मलिक, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव आशिष कुमार सिंह व अमेरिकन वाणिज्य दुताचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.