नॅनो तंत्रज्ञान क्षेत्रात मोठय़ा संधी उपलब्ध असून  एका पाहणीनुसार जागतिक स्तरावर २०२० साली नॅनो तंत्रज्ञानावर आधारित उद्योगाने एक लाख कोटी डॉलरचा टप्पा ओलांडलेला असेल असा अंदाज आहे. या क्षेत्रातील संधी लक्षात घेऊन देशभरातील युवकांनी या क्षेत्रात यावे असे आवाहन बंगलोर येथील नॅनो तंत्रज्ञान केंद्राचे समन्वयक डॉ. प्रकाश सोमाणी यांनी केले.
जिल्हा विज्ञान अध्यापक संघाच्या वतीने घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय विज्ञान परीक्षेचा पारितोषिक वितरण समारंभ त्यांचे हस्ते अकोले येथे झाला. अध्यक्षस्थानी संगमनेर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के. के. देशमुख होते. महाराष्ट्र विज्ञान अध्यापक मंडळाचे सचिव दत्तात्रय आरोटे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
डॉ.  सोमाणी यांनी नॅनो तंत्रज्ञानाची सविस्तर माहिती दिली. तसेच या क्षेत्रात त्यांनी केलेले संशोधन, त्याचे घेतलेले पेटंट याबाबतही विवेचन केले. ते म्हणाले, माहिती तंत्रज्ञानामुळे (आयटी) जसे इंटरनेट व अन्य क्षेत्र उदयास आले तसे नॅनो तंत्रज्ञानामुळे होणार नाही. मात्र या तंत्रज्ञानाच्या वापरामुळे ऊर्जा, औषध, शेती, संरक्षण, आरोग्य या सर्वच क्षेत्रातील तंत्रज्ञानाची कार्यक्षमता शंभर टक्क्यांपर्यंत वाढू शकते. त्यामुळे यावर प्रभुत्व असणा-यांना कोणत्याही क्षेत्रात संधी उपलब्ध असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. भारतातील परंपरागत ज्ञान आणि नॅनो तंत्रज्ञानाच्या समन्वयातून या प्राचीन ज्ञानाचे पुनरुज्जीवन करणे शक्य आहे असा दावा त्यांनी केला.
आरोटे म्हणाले, शालेय विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान संशोधनाची मुळं रुजत आहेत. त्यात या संघटनेचा मोठा वाटा आहे. प्राचार्य देशमुख यांनी झपाटलेल्या विज्ञान शिक्षकांमुळेच जिल्ह्यात वेगळी चळवळ उभी राहिली असल्याचे निदर्शनास आणून दिले. विज्ञान ज्या वयात विकसित व्हायला हवे त्या वयात आजच्या शिक्षणव्यवस्थेत विद्यार्थ्यांची उत्सुकता दाबली जाते त्यामुळेच देशात लोकसंख्येच्या प्रमाणात वैज्ञानिकांची संख्या कमी असल्याचे ते म्हणाले. संघटनेचे अध्यक्ष सुरेश शिंदे यांनी प्रास्ताविक केले. गणेश जोशी यांनी सूत्रसंचालन केले. धनंजय भांगरे यांनी आभार मानले.