औद्योगिकीकरण आणि रोजगारनिर्मितीसाठी केंद्रसरकार कटिबद्ध असल्याचे केंद्रीय इस्पात तथा खाणमंत्री नरेंद्रसिंग तोमर यांनी स्पष्ट केले. ते माणगाव येथील पास्को कंपनीत सुरू करण्यात आलेल्या नूतन युनिटच्या लोकार्पण कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. पास्को कंपनीत सुरू झालेल्या नवीन युनिटमुळे स्टील उत्पादनात भरघोस वाढ होईल, असेही तोमर यांनी स्पष्ट केले. या वेळी महाराट्राचे उद्योगमंत्री सुभाष देसाई, राज्याचे गृहनिर्माण, खनिकर्म व कामगारमंत्री तथा जिल्ह्य़ाचे पालकमंत्री प्रकाश मेहता, आमदार भरतशेठ गोगावले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील पाटील, अपर जिल्हाधिकारी प्रवीण िशदे, पास्को कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओजनूक्नो, मॅनेजिंग डायरेक्टर ली मुत्नी, माणगावच्या उपविभागीय अधिकारी प्रशाली दिघावकर, तसेच पास्को कंपनीचे अधिकारी उपस्थित होते. या वेळी बोलताना श्री.तोमर म्हणाले की, ‘महाराष्ट्रातील पास्को कंपनीचे हे नवीन युनिट निर्माण करण्यासाठी ७०९ मिलियन यू.एस. डॉलर खर्च आला आहे. वार्षकि १.०८ मिलियन टन स्टील उत्पादन या युनिटमुळे होणार असून या युनिटचे लोकार्पण आज होत आहे, याबद्दल मला खूप आनंद होत आहे.’ त्याबद्दल त्यांनी सर्वाना शुभेच्छा दिल्या. आपल्या सर्वाना माहीत आहे की, दक्षिण कोरिया आणि पास्को हे जगातील सर्वात जास्त स्टीलचे उत्पादक आहेत. पास्को उद्योग समूह वर्षांला ४० मिलियन टन स्टील उत्पादन करते. पास्कोजवळ टेक्नॉलॉजी आहे, मनुष्यबळ आहे, भांडवल आहे त्यामुळे स्टील उत्पादनाच्या क्षेत्रात त्यांची नेहमीच अग्रणी भूमिका राहणार आहे, यात कोणतीच शंका नाही. पास्को उद्योग समूहाने भारतात यासारखे अनेक उद्योग सुरू करावेत त्यासाठी भारत सरकार व महाराष्ट्र सरकारचे त्यांना नेहमीच सहकार्य राहील. या युनिटला इथपर्यंत पोहचविण्यासाठी पास्कोच्या ज्या अधिकारी वर्गाने तसेच विविध एजन्सींनी केलेल्या सहकार्याचे त्यांनी या वेळी कौतुक केले. तसेच देशात औद्योगिकीकरण वाढावे, रोजगार निर्मिती व्हावी, परकीय गुंतवणूक वाढावी यासाठी सरकारचे नेहमीच प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे देशातील बेरोजगार नवयुवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. यासाठी भारत सरकार व महाराष्ट्र सरकार प्रयत्नशील राहील, असेही त्यांनी या वेळी सांगितले. राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, पास्को कंपनी भविष्यातही भारत सरकारला व महाराष्ट्र सरकारला असेच सहकार्य करीत राहील, अशी आशा व्यक्त करून, पास्को कंपनीच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी नवीन गृहनिर्माण प्रकल्प लवकरच सुरू करणार आहे, असे घोषित केले. तसेच पास्को कंपनीला राज्य सरकारचे नेहमी सहकार्य राहील, असे सांगितले. या कार्यक्रमास उद्योग समूहातील अधिकारी, तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
संग्रहित लेख, दिनांक 24th Jan 2015 रोजी प्रकाशित
‘औद्योगिकीकरण आणि रोजगारनिर्मितीसाठी केंद्रसरकार कटिबद्ध’
औद्योगिकीकरण आणि रोजगारनिर्मितीसाठी केंद्रसरकार कटिबद्ध असल्याचे केंद्रीय इस्पात तथा खाणमंत्री नरेंद्रसिंग तोमर यांनी स्पष्ट केले.
First published on: 24-01-2015 at 03:09 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Narendra singh tomar industrialisation and employment