Truck Drivers Protest against New Provision : ‘हिट अँड रन’ प्रकरणातील दोषींना कठोर शिक्षेची तरतूद असलेल्या नवीन कायद्याविरोधात देशभरातील ट्रक आणि बसचालकांनी सोमवारीपासून निदर्शने सुरू केली. राज्यातही या आंदोलनाचा प्रभाव जाणवत असून मराठवाडा तसेच उत्तर महाराष्ट्रातील काही पेट्रोल पंपावर इंधनपुरवठा ठप्प झाला आहे. मंगळवारीही हे आंदोलन सुरू राहिल्याने राज्यासह देशातील इंधन पुरवठा खंडित झाला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान आणि मध्य प्रदेशातील ट्रक चालकांनी या आंदोलनात सहभाग घेतला आहे. या ट्रक चालकांनी कामबंदचा इशारा दिल्याने अनेक ठिकाणी ट्रक उभे राहिले आहेत. परिणामी, पेट्रोल-डिझेल, गॅस सिलिंडर, भाजीपाला, बांधकाम साहित्य आणि किराणा सामानाच्या पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. सर्वाधिक फटका इंधन वितरणाला बसला आहे. काही पेट्रोल पंपांपर्यंत ट्रक पोहोचू न शकल्याने अनेक पेट्रोल पंपांवरील इंधन संपलं आहे. तर, काही ठिकणी संपण्याची शक्यता आहे. त्यामुळे अनेक वाहन चालकांनी पेट्रोल पंपांवर रांगा लावल्या आहेत.

हेही वाचा >> ट्रक चालकांचं आंदोलन चालूच, इंधनपुरवठा सुरळीत होण्यासाठी राज्य सरकारचे पोलिसांना मध्यस्थी करण्याचे आदेश!

दरम्यान आता महाराष्ट्र राज्य सरकारने पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी पोलिसांना आदेश दिले आहेत. गॅस सिलेंडर, पेट्रोल-डिझेलसारख्या इंधनाचा पुरवठा सुरळीत व्हावा, यासाठी पोलिसांनी आवश्यक ती पावलं उचलण्याचे निर्देश राज्य सरकारकडून देण्यात आल्याचं वृत्त पीटीआयनं दिलं आहे. तर मध्य प्रदेशातही हीच स्थिती निर्माण झाली आहे. भोपाळमध्ये वाहतूक सेवा खंडित झाल्याने प्रवाशांना एक-दीड तास बस किंवा टॅक्सीची वाट पाहावी लागत आहे. गुजरातमधील खेडा, वलसाड, गिर सोमनाथ, भरूच आणि मेहसाणा यासह अनेक जिल्ह्यांमध्ये निदर्शकांनी सोमवारी वाहने उभी करून आणि नाकेबंदी करून महामार्ग रोखले. त्यांनी मेहसाणा-अंबाजी आणि अहमदाबाद -इंदौर महामार्ग यांसारखे प्रमुख मार्ग टायर जाळून तात्पुरते रोखले, त्यामुळे व्यत्यय निर्माण झाला होता.

“इतर देशांतील कायद्यांप्रमाणेच हिट-अँड-रन अपघात प्रकरणांमध्ये कठोर तरतुदी लागू करण्यापूर्वी, सरकारने इतर राष्ट्रांप्रमणेच रस्ते आणि वाहतूक व्यवस्था सुधरवण्यास प्राधान्य दिले पाहिजे, असं ऑल इंडिया मोटार ट्रान्सपोर्ट काँग्रेस (एआयएमटीसी) च्या परिवहन समितीचे अध्यक्ष सीएल मुकाती पीटीआयच्या मुलाखतीत म्हणाले.

हेही वाचा >> पेट्रोलसाठी लागल्या रांगा; यवतमाळमध्ये अनेक पेट्रोल पंप रिकामे

काय आहे आंदोलकांची मागणी?

केंद्र सरकारने नुकतंच संसदेत भारतीय न्याय संहिता विधेयक पारित केलं. या विधेयकात हिट अँड रन प्रकरणातील आरोपींना होणाऱ्या शिक्षेबाबत, तसेच कारवाईच्या नियमावलीबाबत तरतूद करण्यात आली आहे. त्यानुसार, अपघातात समोरच्या वाहन वा व्यक्तीला धडक देऊन घटनास्थळावरून पळ काढणाऱ्या चालकांना १- वर्षांपर्यंतचा तुरुंगवास किंवा ७ लाख रुपये एवढा दंड आकारण्याची तरतूद करण्यात आली आहे. अशा तरतुदी अन्यायकारक असल्याचा दावा करत ट्रकचालकांनी आंदोलन पुकारलं आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nationwide truckers strike day 2 protesters block roads highways in mp gujarat petrol pumps run dry in maharashtra punjab sgk