देशाचे पंतप्रधान म्हणून आज सूत्रे स्वीकारणारे नरेंद्र मोदी यांच्यावर नक्षलवाद्यांनी एका पत्रकातून टीका केली असून हजारो मुस्लिमांची कत्तल करणारे मोदी, अशा शब्दात त्यांची संभावना केली आहे.
सोमवारी दिल्लीत मोदी व त्यांच्या मंत्रिमंडळाच्या शपथविधीची लगबग सुरू असताना नक्षलवाद्यांनी हे पत्रक जारी केले आहे. दंडकारण्य स्पेशल झोन समितीत कार्यरत असलेल्या पश्चिम क्षेत्रीय समितीचा प्रवक्ता श्रीनिवासच्या स्वाक्षरीने जारी करण्यात आलेल्या या पत्रकात मोदींना पंतप्रधान करण्यामागे देशातील साम्राज्यवादी शक्ती व काही भांडवलदार सक्रीय असून यामुळे जगभरात भारतातील सत्ताकारण हे जनताविरोधी आहे, असा संदेश गेल्याची टीका नक्षलवाद्यांनी केली आहे. केंद्रात सत्तेत असलेल्या आधीच्या युपीए सरकारने सुद्धा देशभरातील गरीब जनतेने चालवलेली चळवळ दडपण्याचा प्रयत्न वारंवार केला. आताही हे आंदोलन दडपून टाकण्याचा प्रयत्न जोमाने होण्याची शक्यता आहे. मोदींचे हात मुस्लिमांच्या कत्तलीने बरबटलेले असून आता त्यांच्या नेतृत्वाखालील सरकार सुद्धा शेतकरी, दलित, आदिवासी, विद्यार्थी व बुद्धीवंतांनी एकत्र येऊन चालवलेले आंदोलन नष्ट करण्यासाठी जोमाने प्रयत्न करतील, अशी भीती नक्षलवाद्यांनी या पत्रकातून व्यक्त केली आहे. याच पत्रकात नक्षलवाद्यांनी दिल्ली विद्यापीठातील इंग्रजीचे प्राध्यापक साईबाबा यांच्या अटकेचा निषेध केला आहे. सत्ताकारणात सक्रीय असलेल्यांना देशातील शहरी भागात दलित शोषितांसाठी काम करणाऱ्या व्यक्तींना अटकाव करायचा असून साईबाबा यांची अटक याचाच एक भाग आहे. काश्मिरी जनतेचे आंदोलन चालवणाऱ्या अफजल गुरूला कोणताही पुरावा नसतांना फासावर लटकवण्यात आले. आता तोच प्रकार क्रांतीच्या मार्गाने वाटचाल करणाऱ्यांच्या बाबतीत सरकारने सुरू केला आहे. हेम मिश्रा, प्रशांत राही व आता साईबाबा यांना झालेली अटक याच धोरणाचा भाग आहे. याआधी विनायक सेन व सुधीर ढवळे यांना याच पद्धतीने तुरुंगात डांबण्यात आले होते. शहरी भागात सक्रीय असलेल्या बुद्धीवंतांच्या वर्तुळात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न सरकारने चालवला असून या विरोधात साऱ्यांनी एकत्र यावे, असे आवाहन नक्षलवाद्यांनी या पत्रकातून केले आहे.