सावंतवाडी: कुडाळ तालुक्यातील माणगाव खोऱ्यात सोमवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे वसोली-कुत्रेकोंड कॉजवेवरून एक दुचाकीस्वार पुरात वाहून गेल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. अमित धुरी (३० वर्ष) असे वाहून गेलेल्या तरुणाचे नाव असून, त्याच्यासोबत असलेला सहकारी सखाराम कानडे हा सुदैवाने बचावला आहे. ही घटना सोमवारी रात्री ८.३० वाजण्याच्या सुमारास घडली असून, एनडीआरएफ पथकाकडून तरुणाचा शोध सुरू आहे.
सोमवारी सकाळपासूनच माणगाव खोऱ्यातील सह्याद्री पट्ट्यात पावसाचा जोर वाढला होता. त्यामुळे वसोली-कुत्रेकोंड कॉजवेवर मोठ्या प्रमाणात पाणी आले होते. याच दरम्यान माणगावहून शिवापूरकडे मोटरसायकलने जात असलेले अमित धुरी आणि सखाराम कानडे यांनी कॉजवेवरील पाण्याचा अंदाज न घेता पाण्यातून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पाण्याचा प्रवाह खूप जास्त असल्याने त्यांची मोटरसायकल प्रवाहाने खाली ओढली गेली. यात अमित धुरी पुलाखालून वाहून गेला, तर त्याचा सहकारी सखाराम कानडे बचावला.
सखारामने तातडीने आरडाओरड केली, परंतु रात्रीची वेळ असल्याने त्याला कोणीही प्रतिसाद दिला नाही. अशा परिस्थितीतही त्याने जवळच्या वसोली येथील एका दुकानावर धाव घेतली आणि घडलेली घटना ग्रामस्थांना सांगितली. त्यानंतर परिसरात एकच धावपळ उडाली आणि आपत्कालीन यंत्रणांना घटनेची माहिती देण्यात आली. तसेच दुसऱ्या घटनेत ६० वर्षीय एक वृद्धही पुरातून बचावला आहे.
आज मंगळवारी सकाळी वाहून गेलेल्या तरुणाचा शोध सुरू झाला आहे. तहसीलदार वीरसिंग वसावे यांच्यासह अधिकारी आणि शोध पथक घटनास्थळी शोधमोहीम राबवत आहेत. कर्ली नदीचे पाणी वेगाने वाहत असल्याने तरुण झाडी-झुडपांमध्ये किंवा दूरवर वाहून गेला असावा, अशी शक्यता स्थानिकांनी वर्तवली आहे.
शोधकार्यात अडथळे:
एनडीआरएफचे आर. जी. यादव यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, “आम्हाला तरुण वाहून गेल्याचे कळताच आम्ही तात्काळ घटनास्थळी पोहोचलो. परंतु, झाडे-झुडपे आणि पाण्याचा तीव्र वेग यामुळे शोधमोहीम राबवण्यात अडथळे येत आहेत. बोटी किंवा इतर साहित्य वापरून शोध घेणे या ठिकाणी शक्य नसल्याने, आमच्या १८ जणांच्या पथकाने स्थानिक जाणकारांच्या मदतीने शोधमोहीम हाती घेतली आहे.”