सांगली परिसरात शेतकऱ्यांपुढे संकट
दिगंबर शिंदे, सांगली</strong>
महापूर ओसरल्यानंतर नदीपात्रात पाणी परतत असताना काठची जमिन खचण्याचे प्रकार घडत असून मळीचा पिकाऊ भाग खचत आहे. कृष्णाकाठी गाळाची जमीन पात्रात विसावत असून यामुळे नदीचे पात्र दोन्ही बाजूला सुमारे २५ फूटांने रूंद होत आहे. नदीकाठी ज्या ठिकाणी झाडे नाहीत, त्या ठिकाणची माती कृष्णेचे पाणी पोटात घेत असल्याने नवीनच संकट नदीकाठच्या शेतकऱ्यांसमोर उभे ठाकले आहे.
गेल्या आठवडय़ातील महापूराचे पाणी सतत नऊ दिवस नदीपात्राबाहेर विस्तारले होते. या काळात जमिनीत पाणी मुरले आहे. तर नदीकाठची जमीन गाळवट आणि काळी आहे. महापूर ओसरताच ओत, नाला, ओढा पात्रातून शिरलेले महापूराचे पाणी परत पात्रात शिरत असताना जमिन खचण्याचे प्रकार ठिकठिकाणी घडत आहेत.
ताकारी पूल ते कसबे डिग्रज बंधारा हे अंतर सुमारे ३५ किलोमीटर आहे. महापूराच्या काळात सलग दहा दिवसांहून अधिक काळ नदीकाठ पाण्यात होता. या काळात महापूराच्या पाण्याचा वेगही जादा होता. ताकारी, तुपारी, नागराळे, शिरगाव, वाळवा, पुणदी, दुधोंडी, नागठाणे, संतगाव, सुर्यगाव, आमणापूर, अंकलखोप, औदुंबर, धनगाव, चोपडेवाडी, भुवनेश्वरवाडी, सुखवाडी, ब्रम्हनाळ, तुंग, डिग्रज या गावचे नदीकाठी असलेले शिवार तुटून नदीत पडण्याचे प्रकार घडत असून जमिनीचा कडा नदीत ढासळल्यानंतर मोठा आवाजही होत आहे.
मळीतील शेतीपंप, झाडे, पिकेही तुटून नदीत पडत असल्याने आर्थिक नुकसान तर होत आहे. नदीच्या दोन्ही तीरावर मूळ पात्रापासून सुमारे २५ फूटाचा पट्टा यामुळे बाधित होत आहे.
हे क्षेत्रच पाण्याच्या मुख्य पात्रात सामील होत असल्याने भविष्यात या क्षेत्रावर पिके घेणेही अशक्य होणार आहे. तसेच गाळवट माती नदीपात्रात जात असल्याने पात्रही उथळ आणि विस्तार जादा होण्याचा धोका निर्माण होत आहे.
जमिनच कृष्णार्पण होण्याचे प्रकार घडत असल्याने शेतकर्याच्या सातबारा उतार्यावर केवळ क्षेत्र बाकी राहणार असून प्रत्यक्षात हे क्षेत्रच गायब झाल्याचे दिसणार असल्याने नदीकाठचा शेतकरी अस्वस्थ झाला आहे. या प्रकारामुळे होणार्या हानीबद्दल कोणतीही नुकसानभरपाईची तरतूद नसल्याने शेतकरी धास्तावला आहे.