अहिल्यानगर : शनिशिंगणापूर येथील शनैश्वर देवस्थान विश्वस्त मंडळाने दि. १ मार्चपासून शनिदेवाची मूर्ती असलेल्या शीळेला भाविकांकडून खाद्यतेलच (ब्रँडेड) अर्पण केले जावे, असा निर्णय घेतल्याची माहिती देवस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष दरंदले यांनी दिली. शनिशिंगणापूरचा ग्रामसभेचा तसा ठरावही करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रिमियम कंटेंट मोफत वाचा

शनिमूर्तीच्या शीळेला भाविकांकडून अखाद्यतेलही अर्पण केले जाते. अखाद्यतेलामध्ये विविध प्रकारची रसायने असल्याची शक्यता नाकारता येत नाही. या रसायनांमुळे मूर्तीची झीज होऊ शकते. या शक्यतेमुळे हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती श्री. दरंदले यांनी दिली.

देवस्थान विश्वस्त मंडळाने या संदर्भात परिपत्रक जारी केले असून त्याची माहिती शनिशिंगणापूर परिसरातील खाजगी व्यावसायिक, देवस्थानच्या आवारातील दुकानदार, गाळेधारक अशा सुमारे ३०० जणांना दिली आहे. देवस्थानच्या विश्वस्त मंडळांने निर्णय घेतल्यानंतर शनिशिंगणापूरच्या ग्रामसभेतही तसा ठराव करण्यात आला.

भाविकांच्या श्रद्धेनुसार २५० मिली. पासून ते ११ डब्यांपर्यंत तेल वाहिले जाते. अनेक भाविक प्लास्टिकच्या पिशवीतून सुट्टे तेलही अर्पण करण्यासाठी आणतात. हे तेल अखाद्य स्वरूपाचे असण्याची शक्यता नाकारता येत नाही, या अखाद्यतेलातील रसायनांमुळे शनिमूर्तीची संभाव्य झीज टाळण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे दरंदले यांनी सांगितले.

आता शनिदेवाला तेल अर्पण करण्यासाठी सुट्टे तेल वाहू दिले जाणार नाही. खाद्य स्वरूपाचे तेलच वाहू दिले जाईल. या तेलाच्या पिशवीवर किंवा बाटलीवर ते खाद्यतेल असल्याचा उत्पादकाचा शिक्का तसेच आयएसआय मार्क पाहिला जाईल. यासाठी महाद्वारावर कर्मचारी नियुक्त केले जातील असे त्यांनी सांगितले.

शनिशिंगणापूर देवस्थान सातत्याने वेगवेगळ्या निर्णयामुळे तर कधी देवस्थानच्या निर्णयामुळे विविध संघटनांकडून होणाऱ्या आंदोलनाने चर्चेत असते.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: New rule at shani shingnapur devotees can offer branded edible oil to shani dev from first march asj