नितीन पखाले, लोकसत्ता

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

यवतमाळ : केविलवाण्या अवस्थेत रस्तोरस्ती भटकणाऱ्या मनोरुग्णांच्या काळोख्या आयुष्यात उजेडाचे काही कवडसे निर्माण करण्यासाठी झटणारी ‘नंददीप फाऊंडेशन’ मनोरुग्णांसाठी कायमस्वरूपी निवारा उभारण्याबरोबरच उपचार आणि समुदेशन केंद्र, स्वयंरोजगार-लघुउद्योग केंद्र असे उपक्रम सुरू करणार आहे. त्यासाठी संस्थेला पाठबळाची आवश्यकता आहे.       

हेही वाचा >>> सन्मानाने जगण्याची ‘आकांक्षा’

संदीप शिंदे, त्यांची पत्नी नंदिनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी स्थापन केलेल्या ‘नंददीप फाऊंडेशन’च्या यवतमाळमधील निवारा केंद्रामुळे अनेक मनोरुग्णांना दिलासा मिळाला. काही रुग्ण बरे होऊन घरी गेले. काहींना वेगवेगळय़ा संस्थांमध्ये सोडण्याचे काम संस्थेने केले. या संस्थेने मनोरुग्णांना केवळ अन्न-वस्त्र-निवाराच दिला नाही तर आता त्यांच्या पुनर्वसनाचे कामही सुरू केले आहे. त्यांच्यातील हस्तकौशल्ये विकसित केली आहेत. या संस्थेने स्वत:च्या जागेवर मनोरुग्णांसाठी कायमस्वरूपी निवारा उभारण्याचा  संकल्प सोडला आहे. 

हेही वाचा >>> तिरंदाजांना नव‘दृष्टी’

कुटुंबाचा आधार तुटलेल्या मनोरुग्णांना त्यांची हरवलेली ओळख पुन्हा मिळवून देण्याचे आणि त्यांना स्वत:च्या पायावर उभे करण्याचे हे कार्य सध्या केवळ दानशूरांच्या बळावर चालू आहे. मनोरुग्णांवर उपचारांसाठी सुसज्ज उपचार आणि समुपदेशन केंद्र, कायमस्वरूपी निवारा, हेल्पलाइन तसेच आजारमुक्त झालेल्या व्यक्तींना सन्मानाने जगता यावे म्हणून स्वयंरोजगार-लघुउद्योग केंद्रासह अन्य सुविधा निर्माण करण्याचा संस्थेचा मानस आहे. त्यासाठी इमारतीची आणि ती उभारण्यासाठी जागेची नितांत गरज आहे. मनोरुग्णांसाठी स्वत:च्या जागेत सुसज्ज अशी निवासी इमारत उभारण्याचा ‘नंददीप फाऊंडेशन’चा संकल्प तडीस नेणे समाजातील दानशूरांच्या हाती आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ngo nandadeep foundation mentally ill in yavatmal zws