पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ‘पाकिस्तान जिंदाबाद’ आणि ‘नारा ए तकबीर, अल्लाह हू अकबर’च्या घोषणाबाजीवर राजकीय वर्तुळातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. अशाप्रकारे घोषणा देणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी भाजपा नेते नितेश राणे यांनी केली आहे. “यापुढे कोणी ‘पाकिस्तान जिंदाबाद’चे नारे लावले, तर ते परत घरी जाणार नाहीत” असा इशारा राणे यांनी दिला आहे. या घोषणाबाजीविरोधात रस्त्यावर उतरू, गरज वाटल्यास घरात घुसू, असे राणे म्हणाले आहेत.

पुण्यात ‘पाकिस्तान जिंदाबाद’, ‘नारा ए तकबीर, अल्लाह हू अकबर’ची घोषणाबाजी; जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील धक्कादायक Video

“आमच्या देशात राहून कोणी जर ‘पाकिस्तान जिंदाबाद’च्या घोषणा देत असतील, तर पोलीस खात्याने त्यांच्यावर कडक कारवाई करावी. अशा प्रवृत्तींची हिम्मत तोडण्याचे काम पोलिसांनी करावे”, असे आवाहन राणे यांनी केले आहे. आम्हाला आमचा देश आणि राज्य वाचवायचे आहे. देशाकडे वाकड्या नजरेने पाहणाऱ्यांविरोधात आम्ही लढत आहोत. पुण्यातील नारेबाजीमुळे राज्याच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत असल्याचे राणे म्हणाले आहेत. या प्रकारावर आम्ही लक्ष ठेवून आहोत. राज्यातील हिंदूत्ववादी सरकारने या लोकांवर कारवाई करावी, अशी मागणी राणे यांनी ‘टीव्ही ९’ या वृत्त वाहिनीशी बोलताना केली आहे.

‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’विरोधात (पीएफआय) राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) केलेल्या कारवाईविरोधात पुण्यात शुक्रवारी सायंकाळी मुस्लीम समुदायामधील काही व्यक्तींनी पाकिस्तानच्या समर्थनार्थ नारेबाजी केली. या घोषणाबाजीचा धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. यावेळी आंदोलकांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविरोधात ‘आरएसएस मुर्दाबाद’ अशीही घोषणाबाजी केली. या घोषणाबाजीनंतर पोलिसांनी काही जणांना ताब्यात घेतले आहे.