Nitesh Rane at RSS Shakha in Sindhudurg : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षातील विजयादशमीचा उत्सव आज (गुरुवार, २ ऑक्टोबर) नागपूर येथील रेशीमबाग मैदानावर साजरा केला जात आहे. यासह देशभरातील विविध ठिकाणी, संघाच्या वेगवेगळ्या शाखांमध्ये मेळावे आयोजित करण्यात आले आहेत, संघ स्वयंसेवक एकत्र येत उत्सव साजरा करत आहेत. दरम्यान, सिंधुदुर्ग येथील संघाच्या एका शाखेत आयोजित कार्यक्रमाला राज्याचे मत्स्य व बंदरे विकास मंत्री नितेश राणे सहभागी झाले होते. खाकी पॅन्ट, पांढरा शर्ट व डोक्यावर काळी टोपी अशा संघाच्या गणवेशात आलेल्या राणे यांना पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या.
नितेश राणे सध्या भारतीय जनता पार्टीत आहेत. मात्र, यापूर्वी इतर पक्षांमध्ये असताना त्यांनी सातत्याने संघावर, त्यांच्या विचारधारेवर, भारतीय जनता पार्टीवर टीका केली आहे. नितेश राणे यांचे संघाच्या कार्यक्रमातील फोटो व व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी राणे यांच्या जुन्या वक्तव्यांची आठवण करून देत त्यांना ट्रोल करण्याचा प्रयत्न केला आहे. नितेश राणे यांनी संघस्वयंसेवकांना यापूर्वी अनेकवेळा ‘हाफ चड्डीवाले’ असा उल्लेख करत डिवचण्याचा प्रयत्न केला होता.
नितेश राणे यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील मीठबाव येथील संघ शाखेला भेट देऊन संघ स्वयंसेवकांसोबत विजयादशमीचा उत्सव साजरा केला. याप्रसंगीचे काही क्षण त्यांनी समाजमाध्यमांवर शेअर केले आहेत. त्यांच्या या पोस्टवर वेगवेगळ्या कमेंट्स पाहायला मिळत आहेत.
संघ देशाला दिशा दाखवतो आहे : नितेश राणे
नितेश राणे म्हणाले, “राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने गेल्या १०० वर्षांत अनुशासन, राष्ट्रभक्ती, सेवा आणि चारित्र्यनिर्मितीचा जो दीप प्रज्वलित केला आहे, तो आज संपूर्ण देशाला दिशा दाखवतो आहे. याच ऐतिहासिक प्रसंगी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील मिठबाव येथील संघाच्या शाखेला भेट देऊन संघ स्वयंसेवकांसोबत विजयादशमीचा उत्सव साजरा केला. यावेळी स्वयंसेवकांशी संवाद साधला तसेच संचलनात सहभागी होऊन त्या उर्जेचा अनुभव घेतला. संघाचे हे शताब्दी वर्ष केवळ उत्सव नाही, तर भविष्यातील भारताचा अढळ निर्धार आहे. संघाचे विचार, राष्ट्रासाठी जगण्याची प्रेरणा आणि हिंदुत्वाचा अभिमान हीच खरी भारताची ताकद आहे!”