मंदार लोहोकरे
सध्या सर्वत्र करोनाचे संकट घोंघावत आहे. शहरी भागात जसा बदल जाणवत आहे. तसा ग्रामीण भागातही जाणवू लागला आहे. ग्रामीण भागातील चावडीवर होणाऱ्या गप्पा आता संचारबंदी आणि करोनाच्या भीतीमुळे बंद झाल्या. तर शहरातून माघारी गावाकडे आलेली मुलं ही बाहेर पडू शकत नाहीत. त्यामुळे आता या चावडीवरच्या गप्पा आता माजघरात रंगू लागल्या आहेत.
ग्रामीण भागात म्हणजे एखाद्या गावात गेल्यावर चावडीवर काही बुजुर्ग मंडळी,काही माणसं एकत्र पहायाला मिळतात. जर कोणी नवीन पाहुणा आला तर त्याला या चावडीवरून माहिती,विचारपूस केली जाती. सकाळी एकदा गप्पांची मैफल जमली की उन्हं डोक्यावर येईपर्यंत गप्पा रंगणार. गावातील प्रश्न,शेतीची कामे, पै पाहुण्याची खबरबात,दुःखद प्रसंग असे अनेक विषयावर चर्चा होण्याचे ठिकाण म्हणजे गावचावडी.
मात्र आता करोनाचे संकट घोंघावू लागले आहे. शहरातून कामाला गाव सोडून गेलेली मंडळी “ गड्या आपला गाव बरा “ म्हणत घरी परतू लागलीत. काही बुजुर्ग आपली पोर कधी येतील याची वाट पाहत आहेत. असे असताना सरकारने करोना बाबत काही उपाय योजना सुरु केल्या. आणि मग चावडीवरच्या गप्पा थांबल्या. पण त्याची जागा घेतली वाड्यातील ओसरी,माजघर यांनी. घर माणसाने भरल्याने ख्याली खुशाली आणि गप्पा आता घरातच रंगू लागल्या.
आजी फावला वेळ आपल्या नातवंडात घालवू लागली. तर मोकळ्या मैदानं मिळाल्याने मुलं निर्धास्त आणि मनमोकळेपणाने खेळू लागली आहेत. आमच्या घरी आता जुन्या काळातील सारीपाट,काच कवडे असे बैठे खेळ खेळतो आणि मग गप्पा मारतो असे पंढरपूर तालुक्यातील भंडीशेगाव येथील डॉ श्रीधर यलमार यांनी सांगितले आहे.असे असले तरी शहरात आणि ग्रामीण भागात जरी आता फरक राहिला नसला तरी माजघरातील गप्पांचे सुख हे शहरातील हॉल मध्ये नक्कीच नाही असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.