डॉक्टर व रुग्णवाहिकेअभावी वेळेवर उपचार न मिळाल्यामुळे दोन दिवसाच्या चिमुकल्याने तब्बल ४०० किलोमीटरचा प्रवास केल्यानंतर नागपुरात शेवटचा श्वास घेतला. वैद्यकीय सेवेअभावी असरअल्लीतील मातेच्या जुळ्यांचा अवघ्या काही तासातच दुर्देवी मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्य़ातील सिरोंचा तालुक्यांतर्गत येणाऱ्या असरअल्ली येथील गगुरी दुर्गेया या महिलेने २५ डिसेंबरला जुळ्या मुलांना जन्म दिला. जन्मताच मुलांचे वजन कमी असल्याने त्यांना अतिदक्षता विभागात ठेवून तातडीच्या उपचाराची गरज होती, परंतु येथे बऱ्याच प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी नसल्यामुळे ३५ ते ४० किलोमीटरचे अंतर तुडवित सिरोंचा येथे आणण्यात आले. तेथेही डॉक्टर व रुग्णवाहिका नसल्याने प्राथमिक आरोग्य केंद्राच्या प्रवेशव्दाराजवळ ही आदिवासी महिला दोन तान्हुल्यांना घेऊन डॉक्टरांची प्रतीक्षा करीत बसली. मात्र, तेथेही तिच्या पदरी निराशाच पडली. जुळ्यांची प्रकृती अधिक चिंताजनक होत असल्याचे बघून या मातेने गावातील काही पत्रकारांकडे व्यथा मांडली. हे वृत्त प्रकाशित झाल्यानंतर तातडीने रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आली. मात्र, अहेरी रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच जुळ्यांपैकी तिच्या अवघ्या काही तासाच्या एका तान्हुल्याने शेवटचा श्वास घेतला, तर दुसरा आईच्या कुशीत शेवटच्या घटका मोजत होता. त्यामुळे त्याला अहेरीपासून शंभर किलोमीटरवरील गडचिरोलीला आणण्यात आले, परंतु तेथेही या तान्हुल्यावर उपचार होणे शक्य नाही, हे लक्षात येताच रुग्णवाहिकेतूनच त्याला नागपूरला हलविण्यात आले. रात्री उशिरा नागपुरात पोहोचत नाही तोच त्यानेही शेवटचा श्वास घेतला.
गडचिरोलीतील आरोग्य खात्याचे तीन तेरा वाजल्यामुळे एका दिवसात चारशे किलोमीटरचे अंतर तुडवूनही या तान्हुल्यांचे प्राण आरोग्य खाते वाचवू शकले नाही. या जुळ्यांच्या मृत्युमुळे गडचिरोलीतील आरोग्य विभागाची खरी परिस्थिती समोर आली आहे. या मृत्यूने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात असली तरी स्थानिक लोकप्रतिनिधी आरोग्य सेवा सुधारेल, या दृष्टीने कुठलेही प्रयत्न करीत असतांना दिसत नाही व आजवर कुणी केलेही नाही.
सिरोंचा, अहेरी, धानोरा, आलापल्ली, एटापल्ली, कोरची या नक्षलग्रस्त तालुक्यात वेळेवर उपचार मिळत नसल्यामुळे आजवर शेकडो बालके दगावली आहेत. हे प्रकरण प्रसार माध्यमांनी लावून धरल्यानंतर आरोग्य खात्याची लक्तरे पुढे आली आहेत. याबाबत टीका होत आहे. आरोग्यमंत्री दिपक सावंत यांनी योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले असले तरी आरोग्य सेवेअभावी स्थानिक आदिवासींना जीव गमवावा लागत आहे त्याचे काय, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.
संग्रहित लेख, दिनांक 29th Dec 2014 रोजी प्रकाशित
उपचार न मिळाल्याने तान्हुल्याचा मृत्यू
डॉक्टर व रुग्णवाहिकेअभावी वेळेवर उपचार न मिळाल्यामुळे दोन दिवसाच्या चिमुकल्याने तब्बल ४०० किलोमीटरचा प्रवास केल्यानंतर नागपुरात शेवटचा श्वास घेतला.

First published on: 29-12-2014 at 01:54 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: No doctor ambulance in gadchiroli second child dies