करोनाचा ‘हॉटस्पॉट’ बनलेल्या जामखेड शहरात दोन दिवसांत एकही करोनाबाधित रुग्ण आढळून न आल्यामुळे प्रशासनाला मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या दोन दिवसांत पाठविलेले स्राव नमुने निगेटिव्ह आले असून आता केवळ पाच अहवालांची प्रतीक्षा आहे.

नगर जिल्हा आरोग्य यंत्रणेच्यावतीने आतापर्यंत १५१८ व्यक्तींचे स्रव नमुने चाचणीसाठी पाठविले. त्यातील १४४८ व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह. एकूण ४३ करोना बाधित व्यक्तींपैकी २४ जणांना रुग्णालयातून घरी पाठविण्यात आले. ते सर्व रुग्ण करोनामुक्त झाले. तर १७ जण रुग्णालयात उपचार घेत आहेत. ५ व्यक्तींच्या अहवालाची प्रतीक्षा आहे.

करोनाचा जामखेड शहर हे हॉटस्पॉट बनले आहे.  तेथे आतापर्यंत १७ रुग्ण सापडले असून एका वृद्धाचा मृत्यू झाला आहे. रविवारी एकाच दिवशी तीन रुग्णाचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. त्यानंतर त्यांच्या संपर्कात आलेल्या १७ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. आता एकही संशयित रुग्णाच्या तपासणीचा अहवाल येणे बाकी राहिलेले नाही. त्यामुळे आता प्रशासनाला दिलासा मिळाला आहे.

जामखेडच्या काझीगल्ली, सदफुलेंवस्ती व नुराणीगल्ली या तीन भागात करोनाचे रुग्ण सापडले होते. पण आता केवळ नुराणीगल्लीत रुग्ण सापडत आहेत. नुराणीगल्लीचा भाग पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. या भागात पोलिसांच्या सहा छावण्या  आहेत. पोलीस देखील करोना बाधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्या लोकांचा शोध घेत आहेत. नुराणी गल्लीचा सर्व भागाशी असलेला संपर्क तोडण्यात आला आहे.

करोनाची प्रमुख केंद्रे असलेल्या नेवासे, संगमनेर व नगर शहरातील मुकुंदनगर, आलमगीर या भागात गेल्या चौदा दिवसांत नवीन रुग्ण आढळून आले नाहीत. प्रशासन नगर जिल्हा करोनामुक्त व्हावा म्हणून प्रयत्नशील आहे.