सोलापूर जिल्ह्य़ात विधानसभा निवडणुकांच्या रणधुमाळीत मोठय़ा प्रमाणात ‘पेड न्यूज’चे पेव फुटले असताना निवडणूक यंत्रणेने त्याची गंभीर दखल घेऊन सर्व ११ विधानसभा जागांवरील प्रबळ अशा २२ उमेदवारांना ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावल्या आहेत. यावर २४ तासांत खुलासा न केल्यास किंवा त्यावर अपील न केल्यास संबंधित ‘पेड न्यूज’चा खर्च गृहीत धरून तो संबंधित उमेदवारांच्या निवडणूक खर्चात धरला जाणार आहे. ‘पेड न्यूज’मध्ये मुद्रित माध्यमांचा सहभाग असून त्यात आघाडीच्या वृत्तपत्रांचा समावेश आहे.

पेड न्यूजवर नजर ठेवण्यासाठी निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार जिल्हा माध्यम प्रमाणीकरण व संनियंत्रण समिती कार्यरत आहे. जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील या समितीची बैठक दररोज होते. गेल्या काही दिवसांत संशयास्पद वाटणाऱ्या निवडणूक प्रचाराच्या एकतर्फी बातम्यांवर समिती नजर ठेवून होती.

पेड न्यूजप्रकरणी नोटीस बजावण्यात आलेल्या प्रमुख उमेदवारांमध्ये सोलापूर दक्षिण मतदारसंघातील भाजपचे उमेदवार तथा सहकारमंत्री सुभाष देशमुख व सोलापूर शहर उत्तरमधील याच पक्षाचे उमेदवार तथा पालकमंत्री विजय देशमुख यांच्यासह सोलापूर शहर मध्य मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवार, आमदार प्रणिती शिंदे, त्यांच्या विरोधात आव्हान देणारे शिवसेनेचे दिलीप माने, सेनेचे बंडखोर महेश कोठे व एमआयएमचे फारुख शाब्दी यांचा समावेश आहे. तसेच माढय़ातील राष्ट्रवादीचे उमेदवार आमदार बबनराव शिंदे व त्यांचे प्रतिस्पर्धी शिवसेनेचे संजय कोकाटे, बार्शीतील शिवसेनेचे उमेदवार, आमदार दिलीप सोपल व त्यांचे विरोधक भाजपचे बंडखोर राजेंद्र राऊत तसेच मनसेचे नागेश चव्हाण यांनाही ‘पेड न्यूज’प्रकरणी नोटीस बजावण्यात आल्या आहेत. याशिवाय करमाळा मतदारसंघातील शिवसेनेच्या रश्मी बागल, सेनेचे बंडखोर तथा विद्यमान आमदार नारायण पाटील व राष्ट्रवादी पुरस्कृत अपक्ष उमेदवार संजय शिंदे या तिघा तुल्यबळ उमेदवारांनाही नोटीस बजावल्या गेल्या आहेत. अक्कलकोटमधील काँग्रेसचे उमेदवार, आमदार सिद्धराम म्हेत्रे व भाजपचे सचिन कल्याणशेट्टी या दोघाही तुल्यबळ उमेदवारांसह मोहोळचे शिवसेनेचे नागनाथ क्षीरसागर यांना, तर माळशिरसचे भाजपचे राम सातपुरे व त्यांचे प्रतिस्पर्धी राष्ट्रवादीचे उत्तम जानकर या दोघांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत. सांगोल्यात शिवसेनेचे शहाजी पाटील या एकमेव उमेदवाराला नोटीस बजावण्यात आली आहे.

‘पेड न्यूज’च्या माध्यमातून काही विशिष्ट उमेदवाराच्या बाजूने एकतर्फी बातम्या प्रसिद्ध होत असल्याचे दिसून आले. त्यानुसार दखल घेऊन संबंधित उमेदवारांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्या आहेत. पुढील २४ तासांत खुलासा मागवून नंतर योग्य ती कारवाई केली जाईल.

– डॉ. राजेंद्र भोसले, जिल्हा निवडणूक अधिकारी, सोलापूर