मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकारकडून अधिसूचना काढण्यात आली आहे. सगेसोयऱ्यांना आरक्षण देण्यासह अनेक तरतुदी या अधिसूचनेत करण्यात आल्या आहेत. त्यामुळे ओबीसी समाजाचे नेते छगन भुजबळ यांनी मराठा आरक्षणाविरोधात आवाज उठवला. तसंच, मराठा आरक्षणाविरोधात त्यांनी ओबीसी एल्गार मोर्चालाही सुरुवात केली आहे. ठिकठिकाणी जाऊन ते ओबीसी समाजाचे मेळावे घेत असून सरकार आणि मराठा समाजातील नेत्यांवर हल्लाबोल करत आहेत. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी टीका केली आहे. आज त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागणार असं देवेंद्र फडणवीसांनी आज नाही. मग ओबीसी समाजात जाऊन आरक्षण जाणार असं भूजबळ का सांगत आहेत? समाजातील लोकांना खोटं का बोलायचं? मराठा समाजाबद्दल मुख्यमंत्री बोलले तेही खोटंच आहे. कायदा बनवल्याशिवाय तुम्हाला मराठ्यांना आरक्षणच देता येणार नाही. पण दोन्ही समाजाला फुगे घेऊन उडवले आणि आता फोडून टाकत आहेत”, अशी टीका जितेंद्र आव्हाडांनी केली.

हेही वाचा >> “ज्येष्ठ नेत्यांनी शारीरिक दगदगीचा विचार करावा, म्हणून…”, ‘त्या’ वक्तव्याप्रकरणी अजित पवारांनी दिलं स्पष्टीकरण

“महाराष्ट्रातील सामाजिक स्वास्थ्य बिघडवण्याचं काम या सरकारने केलं”, असा थेट आरोपही त्यांनी यावेळी केला. ते पुढे म्हणाले, “न्हावी समाजाचा उल्लेख करून काय गरज होती बोलायची? ट्विटर, फेसबूकवरील गोष्टीत मोठ्यांनी लक्ष घालायचं का? जाता जात नाही ती जात म्हणतात. मीही ओबीसी आहे. मलाही माहितेय आमचं आरक्षण कोणाचं बाप काढू शकत नाही. पण ओबीसी समाज थोडा अशिक्षित आहे, अल्पसंख्याक असल्याने दबलेला असतो. त्यांच्या मानसिकतेचा फायदा घेऊन कोणी देशाचा नेता व्हायचा प्रयत्न करतंय आमच्या लक्षात येत नाहीय का? कोणाच्याही भावनांचा वापर करून माथी बिघडवू नका. ही फूट इतिहासात लिहली जाणार आहे”, असंही जितेंद्र आव्हाड म्हणाले.

बापासाठी आम्हाला मरण आलं तरी चालेल

निकाल काय लागणार आहे हे आम्हाला माहितेय. आम्ही काय डरपोक नाही. आमदारकी गेली तर गेली. काय फरक पडतो? ज्या बापाने घडवलं त्या बापासाठी मरण आलं तर आम्हाला नाही फरत पडत. काही वाचवायचं म्हणून काही करायचं हे आमच्या ध्यानी- मनी- स्वप्नी नाही. शरद पवारांसाठी जीवही हजर आहे. जनतेला समजतं ना. जनता देईल परत निवडून आम्हाला”, असंही जितेंद्र आव्हाड म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Obc community being a bit uneducated and a minority jitendra awhads criticism of bhujbal rno news sgk