सांगली, नगर : समाज माध्यमावर आक्षेपार्ह मजकूर ठेवून समाजात तेढ निर्माण करण्याच्या घटना सांगली, बीड आणि नगरमध्ये घडल्या. त्यामुळे तेथे तणाव निर्माण झाला होता. याप्रकरणी नगरमध्ये ११ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला, तर सांगलीत दोघांना ताब्यात घेण्यात आले.
समाजात तेढ निर्माण करणाऱ्या घटना नगर जिल्ह्य़ात नगर, भिंगारसह श्रीगोंदा, जामखेड, कर्जत, पाथर्डी, नेवासे तालुक्यात घडल्या. त्यानंतर तेथे तणाव निर्माण झाला. अनेक ठिकाणी जमावाने निषेधाच्या घोषणा दिल्या.या पार्श्वभूमीवर शहर आणि जिल्ह्यातील पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे.
सांगलीत समाजमाध्यमावर आक्षेपार्ह संदेश प्रसारित करून समाजात तेढ निर्माण करण्याच्या तीन घटना सांगलीतही उघडकीस आल्या आहेत. या संदर्भात पोलिसांनी एका तरुणाला अटक केली, तर एका अल्पवयीन मुलास ताब्यात घेतले आहे. सांगली शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्येही एका तरुणाने औरंगजेबासंदर्भात वादग्रस्त संदेश समाजमाध्यमावर प्रसारित केल्याची घटना समोर येताच पोलिसांनी तत्काळ हालचाली करीत संबंधित तरुणाला अटक केली. आष्टी (जि. बीड) येथील एका तरुणाने ‘बाप तो बाप रहेगा’ असा प्रसारीत केल्याने तणाव निर्माण झाला होता. या प्रकारानंतर सर्व हिंदू संघटनांनी एकत्र येत या तरुणावर पोलिसांत गुरुवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल केला.