सांगली : गणेश आगमन मिरवणुकीवेळी मिरजेतील लक्ष्मी मार्केट परिसरात ध्वनिक्षेपक यंत्रणेतील ध्वनींचा कल्लोळ सुरू असतानाच एका गणेशभक्ताचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याची घटना बुधवारी रात्री घडली. या प्रकरणी संबंधित गणेश मंडळाची ध्वनियंत्रणा पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. तर आगमन मिरवणुकीत ध्वनिमर्यादेचे उल्लंघन झाल्याचे निदर्शनास आल्याने १९ सार्वजनिक मंडळांवर कारवाई प्रस्तावित असल्याचे शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरण रासकर यांनी गुरुवारी सांगितले.
बुधवारी रात्री वडर गल्लीतील एका गणेशोत्सव मंडळाच्या मिरवणुकीत आवाजाच्या भिंती ट्रॅक्टर ट्रॉलीवर बसविण्यात आल्या होत्या. आवाजाची कमाल मर्यादा ओलांडण्यात आली होती. याचवेळी मिरवणुकीसमोर तरुणाईचे नृत्य सुरू असताना बाबासाहेब कलगुटगी (वय ५६) यांच्या छातीत दुखू लागल्याने ते रस्त्यातच कोसळले.
कार्यकर्त्यांनी त्यांना तत्काळ खासगी रुग्णालयात उपचारासाठी नेले, मात्र, उपचार सुरू होण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. ध्वनींचा कल्लोळ सहन न झाल्याने त्यांना हृदयविकाराचा धक्का बसला असल्याची चर्चा शहरात सुरू होती. मात्र, त्यांच्या मुलाने पोलिसांना दिलेल्या जबाबामध्ये त्यांना हृदयविकार होता, डॉक्टरांची औषधेही सुरू होती. बुधवारी त्यांनी औषध घेतले नसल्याचे म्हटले आहे. पोलिसांनी ध्वनिक्षेपक यंत्रासह ट्रॅक्टर व ट्रॉली ताब्यात घेतली आहे.
दरम्यान, या प्रकारामुळे आज शहरातील ध्वनिक्षेपक व लेसर किरणमुक्त अभियान जागृत नागरिकांच्या शिष्टमंडळाने पोलीस निरीक्षक श्री. रासकर यांची भेट घेऊन या घटनेची चौकशी करण्याची आग्रही मागणी केली आहे. यावेळी विराज कोकणे, राकेश तामगावे, ओंकार शुक्ल, मोहन वाटवे आदी उपस्थित होते. वैद्यकीय अहवाल आणि कुटुंबांचे म्हणणे पाहून कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन पोलीस विभागाकडून शिष्टमंडळाला देण्यात आले. गेल्या आठ दिवसांपासून मिरज शहरात विविध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या स्वागत मिरवणुका काढण्यात येत होत्या.
मिरवणुकीमध्ये सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार ध्वनिमर्यादाचे पालन करण्याचे आवाहन वेळोवेळी मंडळाचे कार्यकर्ते, ध्वनिक्षेपक यंत्रणांचे व्यावसायिक यांना करण्यात आले होते. मिरवणुकीमध्ये ध्वनिमापन यंत्रणेसह पोलिसांचे पथक तैनात करण्यात आले असून या पथकाकडून ध्वनिलहरींचे मोजमाप केले असता बुधवारी विविध मंडळांच्या स्वागत मिरवणुका काढण्यात आल्या होत्या, यावेळी पोलिसांनी प्रत्येक मंडळाच्या ध्वनींचे मोजमाप करून त्याच्या नोंदी केल्या असून बुधवारी आठ मंडळांच्या मिरवणुकीत ध्वनिमर्यादेचे उल्लंघन झाल्याचे आढळून आले आहे.
तसेच गेल्या आठ दिवसांत ११ सार्वजनिक मंडळांच्या मिरवणुकीतही ध्वनिमर्यादेचे उल्लंघन आढळून आले असून एकूण १९ मंडळांच्यावर ध्वनिमर्यादेचे उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई प्रस्तावित असल्याचे निरीक्षक श्री. रासकर यांनी सांगितले.