सांगली : सांगली शहरात एक तर ग्रामीण भागात पाच असे सहा गुइलेन बॅरे सिंड्रोमचे (जीबीएस) रुग्ण आढळून आले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यामुळे आरोग्य यंत्रणा सतर्क झाली असून सांगली शहरात रुग्ण आढळलेल्या चिंतामणीनगरामध्ये बुधवारअखेर ६०० घरांचे महापालिकेच्या आरोग्य विभागाने सर्व्हेक्षण करत जलतपासणीही केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सांगली शहरातील चिंतामणीनगरमध्ये एका रुग्णाला जीबीएस आजाराची लक्षणे आढळून आली असून त्याच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. याशिवाय जिल्ह्यात बुधवारअखेर जीबीएसचे सहा संशयित रुग्ण आढळले असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना दिली. संशयित रुग्णावर योग्य उपचार सुरू असून नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन करत असताना पाणी उकळून पिण्याचे आणि स्वच्छतेबाबत दक्षता बाळगण्याचे आवाहन केले आहे.

डॉ. कदम यांनी सांगितले, हातापायामध्ये गोळे, मुंग्या येणे, अशक्तपणा, बोलताना, अन्न गिळताना अडचण आली तर तत्काळ वैद्यकीय उपचार करावेत. का आजार संसर्गजन्य नसल्याने घाबरण्याचे काही कारण नाही. सांगलीत आढळलेला रुग्ण अजमेर, आग्रा आदी ठिकाणी जाऊन आला असल्याने त्या ठिकाणी या आजाराची लागण झाली असल्याची शक्यता असल्याचे ते म्हणाले.

दरम्यान, महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. वैभव पाटील यांनी सांगितले, संबंधित रुग्णाच्या घरातील सात व्यक्तींची तपासणी केली असता ते सामान्य असल्याचे आढळले आहे. परिसरात ६०० घरांचे सर्व्हेक्षण आरोग्य विभागाच्या पथकामार्फत करण्यात आले असून सर्वांची प्रकृर्ती उत्तम आहे. या परिसरात वापरण्यात येणाऱ्या पाण्याची प्रयोगशाळेत तपासणीही करण्यात आली आहे. यामुळे नागरिकांनी कोणतीही भीती न बाळगता लक्षणे दिसताच घरीच न थांबता तत्काळ वैद्यकीय उपचार करून घ्यावेत, असे आवाहनही त्यांनी केले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: One gbs patient detected in sangli city and five to six in rural areas all receiving treatment in private hospitals sud 02