paddy cultivation drop in in raigad but increase in rice production zws 70 | Loksatta

रायगडमध्ये भात लागवडक्षेत्रात घट; तांदूळ उत्पादनात मात्र वाढ, प्रति हेक्टरी अडीच टन धान्य

जिल्ह्यात प्रति हेक्टरी दोन हजार ७६२ किलो एवढे तांदळाचे उत्पादन मिळाले आहे.

रायगडमध्ये भात लागवडक्षेत्रात घट; तांदूळ उत्पादनात मात्र वाढ, प्रति हेक्टरी अडीच टन धान्य
(संग्रहित छायाचित्र)

हर्षद कशाळकर, लोकसत्ता

अलिबाग : वाढत्या औद्योगिकीकरणामुळे रायगड जिल्ह्यातील भातपिकाचे लागवड क्षेत्र घटत असले तरी, आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरामुळे भातपिकाची उत्पादकता वाढली आहे. अनियमित पावसामुळे या वर्षी भाताच्या उत्पादनात घट होईल असा अदांज व्यक्त केला जात होता. मात्र कृषी विभागाने जारी केलेल्या आकडेवारीत भाताच्या उतादनात गेल्या वर्षीच्या तुलनेत वाढ झाली असल्याचे दिसून आले आहे. जिल्ह्यात प्रति हेक्टरी दोन हजार ७६२ किलो एवढे तांदळाचे उत्पादन मिळाले आहे.

सरासरीच्या तुलनेत या वर्षी चांगला पाऊस पडला. पण पावसाचे प्रमाण अनियमित होते. जून आणि ऑगस्टमध्ये सरासरीच्या तुलनेत कमी पावसाची नोंद झाली. तर जुलै आणि सप्टेंबरमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडला. पावसाच्या या अनियमित पणामुळे भात पिकावर परिणाम होईल असा अंदाज व्यक्त केला जात होता. पण भात लागवड आणि कापणी प्रयोगावरून तसे झाल्याचे दिसून येत नाही.

रायगड जिल्ह्यात एक लाख पाच हजार हेक्टर एवढे भात लागवडीखालील क्षेत्र आहे. या वर्षी यापैकी ९५ हजार हेक्टर क्षेत्रावर भातपिकाची लागवड करण्यात आली होती. वाढते औद्योगिकीकरण, मजुरांची कमतरता यामुळे भात लागवडीखालील क्षेत्रात घट झाली. मात्र नैसर्गिक तसेच तांत्रिक संकट येऊनही जिल्ह्यातील भाताच्या उत्पादनात वाढ झाल्याचे दिसून येत आहे.

जिल्ह्यात भाताची उत्पादकता तपासण्यासाठी कृषी विभागाकडून १५ तालुक्यात ३०० पीककापणी प्रयोग घेण्यात आले. अद्याप काही पीककापणी अहवाल अद्याप प्राप्त झालेले नाहीत. पण जे अहवाल प्राप्त झाले. त्यात भाताची उत्पादकता वाढल्याचे दिसून आले आहे. मळणी आणि झोडपणीनंतर भाताची उत्पादकता प्रति हेक्टरी २७ िक्वटल एवढी मिळाली आहे. गेल्या वर्षी ही प्रती हेक्टरी २३.४३ िक्वटल एवढी होती. म्हणजेच यंदा हेक्टरी जवळपास चार िक्वटल उत्पादकता वाढली आहे. म्हणजेच गेल्या वर्षीच्या तुलनेत वर्षी भाताची उत्पादकता वाढल्याचे या पीककापणी प्रयोगांच्या निष्कर्षांवरून सिद्ध होत आहे.

भात लागवडीत केलेला अधुनिक तंत्रज्ञान, सुधारीत बियाणे आणि योग्य प्रमाणात खतांची मात्रा दिल्याने भाताच्या उत्पादकतेत सातत्याने वाढ होत आहे. यास यांत्रिकीकरणाची थोडी जोड मिळाली तर उत्पादकता वाढीबरोबर शारीरिक श्रमाची बचत होण्यास मदत होऊ शकणार आहे.

नाचणी उत्पादनही वाढले..

खरीप हंगामात जिल्ह्यात नाचणीची जवळपास दहा हजार हेक्टर क्षेत्रावर लागवड केली जाते. हिबाब लक्षात घेऊन कृषी विभागाने दहा तालुक्यांत ५० ठिकाणी नाचणीचे पीककापणी प्रयोग घेतले होते. गेल्या वर्षीच्या तुलनेत नाचणीची उत्पादकता प्रति हेक्टरी २०० किलोग्रॅमने वाढल्याचे या पीककापणी अहवालात दिसून आले आहे.

२५ लाख ६५ हजार क्विंटल भात उत्पादन

रायगड जिल्ह्यात यंदा ९५ हजार हेक्टरवर भातपिकाची लागवड करण्यात आली होती. पीककापणीनुसार सरासरी हेक्टरी २७ क्विंटल एवढे उत्पादन मिळाले आहे. म्हणजेच या वर्षी जिल्ह्यात २५ लाख ६५ हजार क्विंटल येवढे विक्रमी भाताचे उत्पादन झाले आहे. राज्यातील इतर भागांत परतीच्या पावसाचा फटका बसला असला तरी या वर्षी कोकणात परतीच्या पावसाचा फारसा त्रास झालेला नाही. त्यामुळे चांगले उत्पादन शेतकऱ्यांना मिळाले आहे. शेतकरी समाधानी आहेत.

कृषी विभागाने पीककापणी प्रयोग घेतले होते. त्यात या वर्षी भाताची उत्पादकता गेल्या वर्षीच्या तुलनेत वाढली असल्याचे दिसून आले आहे. अजून काही तालुक्यांचे पीककापणी प्रयोग अहवाल येणे बाकी असले तरी यंदा भाताचे उत्पादन वाढेल असे प्राप्त आकडेवारीवरून दिसते.

दत्तात्रेय काळभोर, कृषी उपसंचालक, रायगड

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 02-12-2022 at 04:09 IST
Next Story
कालमर्यादेत नस्ती निकाली काढण्याचे बंधन; सरकारी कार्यालयांत १ एप्रिलपासून ‘ई-ऑफिस’ प्रणाली