पंढरपूर : आषाढी यात्रेत ठिकठिकाणाहून पालखी, दिंड्या पंढरीकडे येतात. त्यांच्यासाठी चंद्रभागा नदीच्या पैलतीरावरील ६५ एकर जागेत जागा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. या ठिकाणी मोफत प्लॉट्स भाविकांना तंबू, राहुट्या उभारून वास्तव्य करण्यासाठी देण्यात येत आहेत. प्रथम येणाऱ्या पालखी, दिंडीधारकांना प्रथम प्राधान्य देण्यात येणार असून, प्लॉटनोंदणी सुरू करण्यात आली आहे. संबंधितांनी ६५ एकर येथे आगाऊ प्लॉटची मागणी नोंदवावी, असे आवाहन प्रांताधिकारी सचिन इथापे यांनी केले आले आहे.

आषाढी यात्रेला येणाऱ्या पालखी सोहळ्यासोबत येणाऱ्या दिंड्यांमधील भाविकांच्या निवाऱ्याची सोय चंद्रभागा नदीच्या पैलतीरावरील ६५ एकर (भक्तिसागर) येथे करण्यात आलेली आहे. या ठिकाणी भाविकांना निवाऱ्यासोबत पिण्याचे शुद्ध पाणी, शौचालय, वीजजोड, अन्नपदार्थ शिजवण्यासाठी गॅस वितरण, पोलीस संरक्षण, प्रथमोपचार केंद्र आदी सुविधा या ठिकाणी दिल्या जातात. त्यामुळे या ठिकाणी भाविकांची प्रचंड गर्दी होते. या ठिकाणी एकूण ४९७ प्लॉट्स भाविकांना निवाऱ्यासाठी दिले जातात. या ठिकाणी भाविकांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी आपत्कालीन मदत केंद्र स्थापन करण्यात येते. येथे प्रशासकीय यंत्रणा सुसज्ज व सुरळीतपणे काम करण्यासाठी तहसीलदार सचिन मुळीक यांची सेक्टर मॅनेजर म्हणून नियुक्ती केली आहे. भाविकांना प्लॉट्स वाटप करणे, अडीअडचणी सोडवणे, आपत्कालीन प्रतिसाद केंद्र व त्यावर नियुक्त सेक्टर मॅनेजर व कर्मचारी कार्यान्वित असणार आहेत.

दिंडी, पालखीसमवेत येणाऱ्या भाविकांना ६५ एकर येथे प्लॉट्सचे वाटप करण्यात येणार आहे. आषाढी एकादशीच्या सोहळ्याअगोदर दिंडी, पालखीतील भाविकांनी प्लॉटसाठी मागणी करणे आवश्यक आहे. त्यामुळे प्रथम येणाऱ्यांना प्राधान्य देण्यात येणार आहे. या ठिकाणी भाविकांना मूलभूत सुविधा पुरवण्यात येणार असून, आपत्कालीन प्रतिसाद केंद्रातून भाविकांना सेवा देण्यात येणार आहे. यासाठी नायब तहसीलदार सुधाकर धाईंजे (मो. क्र. ९७६७२४८२१०), तसेच ग्राम महसूल अधिकारी दादासाहेब पाटोळे (मो. क्र. ९९७०१०९९१९), प्रमोद खंडागळे, तसेच वैभव कट्टे यांच्याकडे संपर्क साधावा, असे आवाहनही प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.