धुळ्यातील शिंदखेडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक देविदास भोज यांना लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने लाच घेताना पकडले. शेवाळी ता. शिंदखेडा येथील तक्रारदाराला आरोपपत्राची झेरॉक्स हवी होती. त्यासाठी वारंवार मागणी करुन देखील पोलीस ठाण्यात त्याच्या मागणीकडे दुर्लक्ष करत होते. अखेर तक्रारदाराने निरीक्षक देविदास भोज यांची भेट घेऊन आरोपपत्राच्या झेरॉक्सची मागणी केली. ती देण्यासाठी निरीक्षक भोज यानी तक्रादाराकडे एक हजार रुपयांची मागणी केली. याबाबत तक्रारदाराने धुळे लाचलूचपत विभागाकडे तक्रार दाखल केली. त्यानंतर सापळा रचून पोलीस अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात आली.

उपअधिक्षक शत्रुघ्न माळी यांच्यासह जितेंद्र परदेशी, प्रशांत चौधरी, संदीप सरग, संतोष हिरे, सुधीर सोनवणे आणि पथकातील कर्मचाऱ्यांनी सापळा रचून शिंदखेडा येथील भुषण हॉटेलच्या रुम क्रमांक ४ मधून पोलीस निरीक्षक देविदास भोज यांना हातोहात पकडले. याप्रकरणी भोज या अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धुळे जिल्ह्यात भोज यांची कारकीर्द अगोदरपासूनच वादग्रस्त राहिल्याची नागरिकांत चर्चा सुरु झाली आहे.